लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि त्यांच्या गँगकडून मनसूख हिरेन यांच्या कुटूबियांना धोका आहे. परिणामी, त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी केली. दरम्यान, हिरेन कुटूंबियांना सोमय्या यांनी मागणी करण्यापूर्वीच सशस्त्र पोलीस संरक्षण दिल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी ‘लोकमत’ला दिली.हिरेन यांच्या कुटूंबीयांची सोमय्या यांनी मंगळवारी ठाण्यातील ‘विजय पाम’ या इमारतीमधील त्यांच्या घरी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही मागणी केली. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अंटालिया’ या इमारतीच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांची मोटारकार ही ठाण्यातील मनसुख यांची होती. याप्रकरणी चौकशी सुरु असतानाच मनसुख यांचा मृतदेह ५ मार्च रोजी मुंब्रा रेतीबंदर खाडीत सापडला होता. त्यानंतर हिरेन यांची आत्महत्या की हत्या याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. दरम्यान, हिरेन यांच्या कुटूंबियांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना सोमय्या म्हणाले की, मनसुख यांचे कुटूंबीय हे अत्यंत दु:खी आणि भीतीच्या छायेखाली आहे. या सर्व प्रकरणात त्यांचा प्रामाणिक माणूस गेल्याचे त्यांना दु:ख आहे. सुरुवातीला या प्रकरणाला ज्याप्रमाणे पोलिसांनी आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यांना प्रचंड यातना झाल्या आहेत. पोलिसांच्या या भूमिकेबाबत मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे त्यांना जाब विचारतील का? असा प्रश्नही यावेळी सोमय्या यांनी उपस्थित केला. हे माफियाचे सरकार आहे. ते सचिन वाझे यांना अटक करणार नाही. वाझे आणि गँग काही करू शकते. त्यामुळेच मनसुख यांच्या कुटूंबियांना संरक्षण देणे गरजेचे आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार वागत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.दरम्यान, सध्याची संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता मनसुख यांचा मृतदेह मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवसांपासून म्हणजे ६ मार्च पासून एक पोलीस हवालदार आणि तीन पोलीस अंमलदार असे सशस्त्र पोलीस संरक्षण हिरेन कुटूंबियांना पुरविण्यात आल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. विजय पाम या हिरेन यांचे निवासस्थान असलेल्या इमारतीमध्ये येणाºया आणि जाणाºया प्रत्येकाची नोंद ठेवण्यात येत असल्याचे या सोसायटीतील एका सुरक्षा रक्षकाने सांगितले.
Mansukh Hiran: हिरेन यांच्या कुटूंबियांना ठाणे पोलिसांनी दिले सशस्त्र संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 9:43 PM
पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि त्यांच्या गँगकडून मनसूख हिरेन यांच्या कुटूबियांना धोका आहे. परिणामी, त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी केली.
ठळक मुद्दे वाझे यांच्याकडून धोका असल्याचा सोमय्या यांचा आरोप