ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली महत्त्वाची कामे बंद करण्याचा इशारा ठाण्यातील ठेकेदारांनी दिला आहे. किमान जुन्या कामाची बिले तरी ठाणे महापालिकेने काढावी, अशी मागणी १८० ठेकेदारांनी केली आहे. जवळपास ७०० ते ८०० कोटींची थकबाकी ठाणे महापालिकेकडे असून, घर चालवणेदेखील मुश्कील कठीण झाल्याने काहींनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने बिले स्वीकारणेच बंद केले आहे. शहरात ठेकेदारांच्या माध्यमातून अनेक महत्त्वाची कामे सुरू आहेत. केलेल्या कामांची बिलेच मिळत नसल्याने कामगारांना पगार देण्यासाठीही पैसे नसल्याने काम करणे कठीण झाले आहे. बिले निघत नसल्याने ठेकेदारांनी पालिका मुख्यालयात काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते; मात्र अद्याप बिल अदा न झाल्याने मंगळवारी पुन्हा आंदोलन करून त्यांनी काम बंद करण्याचा इशारा दिला. ठेकेदारांनी कामे बंद केली तर शहरातील परिस्थिती मात्र बिकट होण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांची ठेकेदारांनी भेट घेतली असून, माळवी यांनी आयुक्तांसोबत यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.