लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मराठीमध्ये लिहिलेली बरीच आत्मचरित्रे खोटी असतात. पण याला पुरावा नाही, असे वक्तव्य ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी केले. माजी मुख्याध्यापक अरुण जोशी यांनी लिहिलेले त्यांचे शैक्षणिक आत्मकथन ‘घडताना, घडविताना’ तसेच शिक्षिका आशा जोशी यांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनपर व ललित लेख यांचा समावेश असलेले ‘जे पाहिलं ते, जे वाटलं ते’ या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शनिवारी श्रीमती सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिर येथे बागवे यांच्या हस्ते झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर, माजी शिक्षणाधिकारी एल्. पी. माळी, माजी सहसंचालक अरुण ठाकरे, वर्तकनगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र आयरे आदी उपस्थित होते. शिक्षक निवृत्त झाला तरी त्याला प्रवृत्त करणारे शिष्य असतात हे नमूद करताना बागवे यांनी त्यांनी ज्ञानेश्वरीचा अकरावा अध्याय सांगितला.
ते पुढे म्हणाले, मला शिक्षकांच्या कार्यक्रमाला जायला आनंद होतो तिथे लबाडी नसते. महाविद्यालयीन प्राध्यापकांपेक्षा मला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक जास्त आवडतात, या शिक्षकांकडे मातीचे गोळी आलेले असतात आणि त्याला आकार देण्याचे काम ते करतात.
‘भटकंती ही मनातल्या मनात असते’जो विद्यार्थ्यांच्या मनाच्या शेतीची मशागत करतो तो शिक्षक असतो. विद्यार्थी कुठेही भेटला तरी तो शिक्षकाला नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाही आणि हे महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले संस्कार आहेत. पर्यटन हे आखून रेखून केले जाते. भटकंती ही मनातल्या मनात असते. पहिले पुस्तक हे त्या लेखकाचे अपत्य असते. शिक्षकाला कोणत्याही पद्धतीने अक्षर प्रवास थांबवू शकत नाही, असे त्यांनी शेवटी नमूद केले.