मीरारोड - मीरा भाईंदर भाजपातील अनेक नगरसेवकांसह जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी भाईंदरच्या उत्तन येथील केशव सृष्टी मध्ये आलेले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन तक्रार वजा निवेदन दिल्याची माहिती समोर आली आहे . त्यामुळे भाजपातील अंतगत वाद धुमसत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे .
मीरा भाईंदर पालिकेतील सत्ताधारी भाजपातील सुमारे निम्मे नगरसेवक माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या एकूणच कार्य पद्धती , वादग्रस्त प्रतिमा आणि पक्ष - पालिकेतील हस्तक्षेप या विरोधात एकवटले आहेत . तर दुसरीकडे स्वतःच राजकारण सोडल्याचे सांगणारे मेहता पालिका आणि पक्षाच्या कारभारात मात्र सक्रिय आहेत .
पक्षातील अनेक नगरसेवकांनी मेहतां विरुद्ध उघड भूमिका घेतली असून त्याच अनुषंगाने नाराज नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन मेहतां विरोधात लेखी तक्रार वजा निवेदन दिले आहे . त्यावेळी भाजपातील अनेक ज्येष्ठ व प्रमुख नगरसेवकांसह खुद्द जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे देखील उपस्थित होते .
यावेळी नगरसेवकांनी मेहतां मुळे पक्षाची होत असलेली बदनामी आणि विधानसभा निवडणुकीत झालेले नुकसान तसेच येणाऱ्या २०२२ च्या पालिका निवडणुकीत मेहतांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढणे शक्य नसल्याचे मुद्दे पाटील यांच्या समोर मांडले . शिवसेनेतून देखील पक्ष प्रवेश करा म्हणून सतत फोन येत असून आम्ही मात्र पक्षाचे निष्ठावंत म्हणून कुठे जाणार नसलो तरी मेहतां बाबत निर्णय पक्षश्रेष्ठींनी तातडीने घ्यावा असा आग्रह नगरसेवकांनी धरल्याचे सूत्रांनी सांगितले .
मेहतांनी भाजपाच्या आड स्वतःचा आणि कंपनीचा भरपूर फायदा करून घेतला आहे . शिवाय पालिका आणि पक्षात मनमानी प्रकार चालवले आहेत . त्यामुळे हे सर्व सहन होण्या पलीकडे गेल्याचे मुद्दे मांडल्या नंतर चंद्रकांत पाटील यांनी दिवाळी नंतर या विषयावर मार्ग काढू. हाताला झालेली जखम आधी बरी होते का ते पाहू . जखम बारी होत नसेल तर हात कापावा लागतो असे उदाहरण देऊन त्यांनी तूर्तास नाराज नगरसेवकांची समजूत काढल्याचे सूत्रांनी सांगितले .
या प्रकरणी माजी उपमहापौर चंद्रकांत वैती , माजी सभापती रवी व्यास , सुरेश खंडेलवाल आदीं कडे प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता त्यांनी मात्र , आमचे नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आले असल्याने त्यांची सदिच्छा भेट घ्यायला गेलो होत . त्यावेळी शहराचा विकास , पक्ष व पालिका आदींवर चर्चा झाली असे सांगितले .