उल्हासनगर : महापालिकेने शहरातील डॉक्टरांच्या झाडाझडतीचे संकेत दिल्याने झोपडपट्टीतील अनेक दवाखाने बंद आहेत. मागील रविवारी १६ वर्षाच्या मुलीचा अवघ्या काही तासात तापाने मृत्यू झाल्याचा प्रकार उघड झाल्यावर, बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. ‘लोकमत’च्या शनिवारच्या ‘हॅलो ठाणे’मध्ये ‘बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.उल्हासनगरमधील झोपडपट्टी भागात बोगस डॉक्टर लहान-लहान क्लिनीक चालवत आहेत. त्यांच्या दवाखान्याच्या नामफलकावर वैघकीय पदव्या दिसत असल्या तरी त्या बहुतांश उत्तर प्रदेश, बिहार आदी भागातील आहेत. त्यातील अनेक डॉक्टर बोगस असल्याचा आरोप होत असून त्यांच्या चुकीच्या औषधोपचाराने अनेकांचा मृत्यू झाल्याचा आरोप समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केला. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाºयांनी शहरातील डॉक्टरांची झाडाझडती घेतली नसल्याने बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. शहरात बोगस डॉक्टर असल्याचे उघड झाल्यावर महापालिका वैघकीय अधिकाºयांना मुलीच्या मृत्यू प्रकरणी सहआरोपी करण्याची मागणीही केली जात आहे.कॅम्प नं-४ संभाजी चौकातील १४ वर्षाच्या मुलाचा तापाने १५ दिवसापूर्वी मृत्यू झाला. तर गेल्या रविवारी १६ वर्षाच्या मुलीचा काही तासात चुकीच्या उपचाराने मृत्यू झाला, असा आरोप आई-वडिलांनी करून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात डॉक्टर विरोधात तक्रार केली आहे. असे अनेक प्रकार झोपडपट्टी परिसरात घडत असून पालक आर्थिक परिस्थितीमुळे दाद मागत नाही. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी अशा बोगस डॉक्टरांना पाठिशी घालत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टर पालिकेच्या रडारवर, झाडाझडतीच्या भीतीने झोपडपट्टीतील अनेक दवाखाने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 2:55 AM