भिवंडी : भिवंडी शहराचा विकास आराखडा मनपा आयुक्तांनी मागील महिन्यात जाहीर केला आहे, मात्र हा विकास आराखडा बनवताना भिवंडीकरांसह विस्थापित नागरिकांचा विचार केला गेला नसून आराखड्यात अनेक त्रुटी असल्याचा आरोप भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केला आहे गुरुवारी आमदार शेख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला आहे. विकास आराखड्यामध्ये बाधितांच्या पुनर्वसनासाठी पालिका प्रशासनाकडे कोणतीही योजना नसल्याने मागील वीस वर्षांपूर्वीचा शहर विकास आराखडा देखील रखडला असून या आराखड्याप्रमाणे केवळ पाच टक्केच काम झाले हे शहराचे दुर्दैव असून आर्थिक डबघाईला आलेल्या मनपा प्रशासनाकडे नव्या विकास आराखड्याप्रमाणे शहर विकासकामांसाठीची निधी कुठून आणनार असा सवाल देखील आमदार शेख यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
विकास आराखड्यामध्ये बाधित होणाऱ्या घरांना व जमीन मालकांना बाजार भावा प्रमाणे मोबदला देणे बंधनकारक असतानाही भिवंडी मनपाकडून त्याबाबत कोणतेही आश्वासन अथवा घोषणा अद्याप करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्याचबरोबर या आराखड्यातील आरक्षणामध्ये देखील अनेक त्रुटी असून,जिथे रस्त्यांची गरज नाही अशा ठिकाणी रस्ते दर्शविण्यात आले असून, जेथे रस्त्यांची गरज आहे अशा रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप देखील यावेळी आमदार शेख यांनी केला आहे.
शहर विकास आराखडा जाहीर झाल्यापासून अनेक दलालांनी नागरिकांकडे धावा घेतला आहे, मात्र नागरिकांनी कोणत्याही दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये त्यासाठी नागरिकांना काही अडचणी अथवा प्रश्न असल्यास थेट मनपा प्रशासनाशी अथवा लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी आमदार शेख यांनी केले असून शहरातील बाधितांना केवळ टीडीआर नको तर बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा तसेच वन विभागाच्या जागेवर असलेल्या घरांना देखील मोबदला देण्यात यावा व विकास आराखड्याबाबत आक्षेप घेण्याची मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी आमदार शेख यांनी केली आहे.