ठाणे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिंदे,फडणवीस सरकारला दिलासा मिळाल्यानंतर ठाकरे गटातील उरलेले आमदार आणि खासदारही आमच्याकडे येतील त्याचसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस देखील फुटीच्या उंबरठ्यावर असून महाविकस आघाडीतील आमदारही आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. येणाऱ्या विधासभेच्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवण्यात येणार असल्याचेही म्हस्के यांनी यावेळी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिंदे, फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा गड असलेल्या ठाण्यात सकाळपासूनच कार्यकर्त्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता लागली होती. निकाल लागल्यानंतर ठाण्याचे जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी विरोधकांवर विशेष करून संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. संजय राऊत यांचा सकाळचा भोंगा असा उल्लेख करत जे लोक सरकार पायउतार होणार असे बोलत होते त्यांना या निकालानंतर मोठी चपराक बसली आहे. संजय राऊत यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपायला हवे असा टोलाही म्हस्के यांनी राऊत यांना लगावला . विरोधकांकडून केवळ सहानुभूतीसाठी अशाप्रकारची टीका करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
येणाऱ्या विधानसभेची निवडणूक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. तर उद्धव ठाकरे यांना ५० आमदार सांभाळता आले नाही , उरलेलं आमदार आणि खासदारांसमवेत महाविकास आघाडीतील आमदार देखील आमच्या संपर्कात असल्याचा दावा यावेळी म्हस्के यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.