रवींद्र साळवे, मोखाडामोखाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १५९ शाळा असून तालुक्यातील शाळांत २२ मुख्याध्यापक, ६३ पदवीधर, ३४५ उपशिक्षक, असे मिळून ४३० शिक्षक कार्यरत आहेत, तर ४० पदे रिक्त असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. गंभीर बाब म्हणजे, कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये अधिक शिक्षक कार्यरत आहेत, तर जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये कमी शिक्षक अशी धक्कादायक माहिती लोकमतच्या हाती आली आहे. याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असून सगळा सावळा गोंधळ सुरू आहे.तालुक्यातील कळमगाव जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण दिले जात असून येथे एकच शिक्षक कार्यरत आहे. तर, भोईपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवीचा वर्ग असून १८ मुलांचा पट आहे. परंतु, या ठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहेत. तसेच कुंडाचापाडा येथे पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असून ५९ मुलांचा पट आहे. शिक्षक मात्र एकच. याउलट करोळ येथील जि.प शाळेत १३ मुलांचा पट असतानादेखील दोन शिक्षक आहेत. यामुळे ४७ मुले एकाच शिक्षकाकडून ज्ञानार्जन करीत असतील तर त्या मुलांची गुणवत्ता कशी वाढेल, असा प्रश्न पालक विचारत आहेत. पिंपळपाडा येथील जि.प. शाळेत ४२ मुलांची पटसंख्या असून एकच शिक्षक असल्याने ग्रामस्थांनी अनेकदा शिक्षकांची मागणी करूनदेखील तिच्याकडे अधिकारीवर्गाकडून दुर्लक्ष होत आहे. अशीच काहीशी अवस्था मडक्यांची मेट जि.प. शाळेतदेखील आहे. या शाळेत पहिली ते आठवी पर्यंत वर्ग असून ११० विद्यार्थी आहेत. त्यासाठी चार शिक्षक कार्यरत असून चारपैकी एक शिक्षक आजारी असल्याने रजेवर आहे, तर उर्वरित तीन शिक्षकांपैकी एका शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचा पदभार असल्याने शालेय कामासाठी वारंवार तालुक्याला यावे लागते. त्यामुळे ११० विद्यार्थ्यांना केवळ दोन शिक्षक ज्ञान देण्याचे काम करत असून गटशिक्षणाधिकारी प्रशांत जाधव यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे शासनाने प्राथमिक शिक्षण हक्काचे व सक्तीचे करणारी तरतूद भारतीय संविधानात केलेली असली तरी या आदिवासी भागात त्यांची अंमलबजावणी स्थानिक प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे होतांना दिसत नाही.तसेच दहा ते पंधरा मुलांचा पट असल्यास गटशिक्षणाधिकारी यांनी समायोजन करणे आवश्यक आहे. परंतु, या बाबीकडे शिक्षण खात्याचे साफ दुर्लक्ष होत आहे. याबाबत, गटशिक्षण अधिकारी प्रशांत जाधव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कॉल उचलला नाही.
अनेक शाळांना शिक्षकच नाहीत
By admin | Published: October 16, 2015 1:53 AM