- नितिन पंडित
भिवंडी: कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले असून राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून संचार बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील सुमारे 14 नागरिक परदेशातून परत आल्यानंतर या नागरिकांना होम कॉरंटाईन केल्याने ग्रामीण भागात देखील कोरोनाबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागातील अनेक गावांनी आपल्या गावातील मुख्य रस्त्यांवर प्रवेश बंदी केली आहे. सतर्कता म्हणून गावांच्या सुरूवातीला नोएंट्रीचे बोर्ड लावून गावचे मुख्य रस्ते स्वयंस्फूर्तीने बंद केले आहेत.
सर्वत्र कोरोना व्हायरसचा धोका वाढत असताना भिवंडी तालुक्यात मलेशिया, दुबई, युएई, सिंगापूर, माॅरेशिएस इत्यादी देशातून परत आलेले 14 नागरिक होम कोरंटाइनखाली आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता जरूर घ्यावी परंतू घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन भिवंडी तालुका आरोग्य विभागाकडून वारंवार केले जात आहे. दरम्यान भिवंडी तालुक्यातील वडघर , डुंगे ,कारीवली , खारबाव , जुनांदूरखी, चाणे , वावली, मानिवली, पारिवली , कोलीवली, कुरंद , घोटगांव, पहारे बापगांव , देवरूंग , इत्यादी गावांसह अनेक गावांमध्ये तेथील नागरिकांनी कोरोनाबाबत सतर्कता म्हणून गावांच्या सुरुवातीला नोएंट्रीचे बोर्ड लावून गावचे मुख्य रस्त्यावर वृक्षांच्या तोडलेल्या फांद्या व बांबू टाकून स्वयंस्फूर्तीने बंद केले असून बाहेरील लोकांना गावांत प्रवेश बंद केला आहे.
दरम्यान एका गावातील 74 नागरिक 8 मार्च रोजी वाराणसी, आयोध्या, शिर्डी इ. ठिकाणी गेले होते व ते 10 दिवसांचा प्रवास करून 18 मार्च रोजी परतले असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या 74 जणांना देखील होम कोरंटाइनखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.