लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : लॉकडाऊनच्या विरोधात व्यापाऱ्यांनी दंड थोपटले असून, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे, तर दुसरीकडे उपासमारीच्या भीतीने हजारो कामगार गावाला गेले असून, अनेकांवर बेरोजगाराची टांगती तलवार आहे. लॉकडाऊन काळात कामगारांना पगार देण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्याची प्रतिक्रिया यूटीए व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक छतलानी यांनी दिली.
उल्हासनगरमध्ये फर्निचर मार्केट, जपानी व गजानन कापड मार्केट, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल मार्केट, जिन्स मार्केट, गाऊन मार्केट, बॅग मार्केटबाबत देशात आकर्षण आहे. या प्रसिद्ध मार्केटमधील दुकाने व कारखान्यांमध्ये लाखो कामगार काम करतात. कामगारांमध्ये मराठी, उत्तर प्रदेश व बिहारी कामगारांचा मोठा भरणा आहे. दोन वर्षांपूर्वी प्रदूषणाच्या नावाखाली शेकडो जिन्स वॉश कारखान्यांवर राज्य प्रदूषण मंडळाने कारवाई करून कारखाने सील केल्यावर ५० हजारांपेक्षा जास्त कामगार बेकार होऊन त्यातील अर्धेअधिक कामगार स्थलांतरित झाले. जिन्स वॉश कारखान्यावर गंडांतर आल्यावर शेकडो व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय व कारखाने अंबरनाथ, बदलापूर, कल्याण ग्रामीण, भिवंडी आदी ठिकाणी स्थलांतरित केले.
गेल्यावर्षीप्रमाणे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी विरोध केला. यूटीए व्यापारी संघटनेच्या अंतर्गत शहरातील ५० पेक्षा जास्त लहान-मोठ्या व्यापारी संघटना एकवटल्या आहेत. संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी थेट निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ठाकरे व फडणवीस यांच्याकडे साकडे घालून लॉकडाऊनला विरोध केला. लॉकडाऊनमुळे कामगारांवरच नव्हे तर असंख्य व्यापाऱ्यांवरही उपासमारीचे दिवस येणार आहेत. शहरातील मार्केटमध्ये एक लाखापेक्षा जास्त कामगार काम करीत आहेत. त्यापैकी हजारो जणांनी लॉकडाऊनच्या भीतीने गावाला जाणेच पसंत केले. तर इतरांना व्यापारी व दुकानदारांनी वेतन देण्याचे आश्वासन दिल्याने कामगार थांबले आहेत. मात्र एका महिन्यापेक्षा जास्त लॉकडाऊन झाल्यास व्यापाऱ्यांसह कामगारांवर उपासमारीची शक्यता निर्माण झाल्याची प्रतिक्रिया व्यापारी संघटनेने दिली.
व्यापारी व कामगारांना पॅकेजची मागणी
शेतकऱ्यांप्रमाणे व्यापारी व कामगारांना लॉकडाऊनच्या काळात पॅकेज देण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. पॅकेज दिले तर, व्यापारी व कामगारांमध्ये उडालेला असंतोष कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नाका कामगारांची संख्याही घटल्याचे चित्र दिसत आहे. बांधकाम व्यवसाय सुरू असला तरी घरात कामे काढण्यास नागरिक धजावत नसल्याने कामगार येत नसल्याचे सांगण्यात आले.