स्नेहा पावसकरठाणे : आपला पाल्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकावा, यासाठी बहुतांशी पालक आग्रही दिसतात. त्या तुलनेत मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेणाºयांचे प्रमाण कमी होते आहे. परिणामी, अनेक मराठी शाळांना घरघर लागली आहे. मात्र, मराठी शाळा टिकाव्या, यासाठी १० दिवसांपूर्वी मुंबईत मराठी शाळा संवर्धन नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप सक्रिय झाला असून त्यात ठाणेकर मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत शिकवणे हे अनेक पालकांना ते प्रतिष्ठेचे वाटते. मात्र, त्या विद्यार्थ्यांचे धड इंग्रजी चांगले नसते आणि मराठीही चांगले नसते. त्यामुळे भाषेच्या बाबतीत विद्यार्थ्यांची एकूणच फरफट होते. यापेक्षा मुलांना लहान वयातच मातृभाषेतूनच शिक्षण द्यावे यासाठी मराठी शाळा संवर्धनासाठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा म्हणजे त्यांनी मराठी शाळा संवर्धन हा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून पालकांच्या मनात मराठी शाळांविषयी विश्वास निर्माण केला, तर भविष्यात पुन्हा मराठी शाळांत प्रवेश घेणाºयांची संख्या वाढू शकते, असा विश्वास या ग्रुपचे संस्थापक संदीप सावंत यांनी व्यक्त केला.हा ग्रुप तयार करणे, त्याचे कार्यस्वरूप कसे असेल, याबाबत २-३ महिने काम चालू होते. १० दिवसांपूर्वी हा व्हॉट्सअॅप ग्रुप सक्रिय झाला असून यात राज्यभरातील मराठी भाषाप्रेमी सहभागी होत आहेत. वाढत्या सदस्यांनुसार त्या-त्या जिल्ह्यांचे, शहरांचे, विभागांचे गट तयार करण्यात येणार आहेत. या ग्रुपमध्ये आतापर्यंत सुमारे २०-२५ ठाणेकर सदस्य झाले आहेत. तर, ठाण्यातून आणखी काही रिक्वेस्ट आल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या माध्यमातून शहरात क्रियाशील गट कार्यरत करण्यात येणार आहे. ठाण्यातील मराठी शाळांची संख्या, त्यांची अवस्था, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याची चर्चाही ग्रुपवर करणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली. ठाण्यातील सदस्यांची संख्या वाढावी आणि पर्यायाने मराठी शाळा संवर्धनाची ही मोहीम वेगाने सक्रिय व्हावी, या उद्देशाने लवकरच ठाण्यातही एक बैठक घेण्यात येणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.मुलांना लहान वयातच आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण दिले, तर विद्यार्थ्यांचा बौद्धिक दर्जा वाढू शकतो, हे लक्षात घेत काही मराठी शाळांतील शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि मराठी भाषाप्रेमींनी एकत्र येत मराठी शाळा संवर्धनासाठी मोहीम सुरू केली आहे.
‘मराठी शाळा संवर्धना’साठी ठाणेकरही सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 1:49 AM