कल्याण : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसह काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ बुधवारी (25 जुलै) सकल मराठा समाजातर्फे कल्याण बंदची हाक देण्यात आली आहे. शासकीय विश्रामगृहात आज झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
आज मुंबई, ठाणेसह इतर जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रातबंद पाळण्यात येत आहे. मात्र उद्या बुधवारी 25 जुलैला कल्याणात मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याने आज कल्याण डोंबिवलीतील सकल मराठा समाज या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाला नाही. कल्याणमध्ये होणाऱ्या मोर्चातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. उद्याचा बंद हा अत्यंत शांततेच्या मार्गाने केला जाणार असून त्यामध्ये कल्याण डोंबिवलीसह दिवा, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर, विरार आदी ठिकाणचे मराठा बांधव मोठ्याप्रमाणात सहभागी होणार असल्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. तसेच मराठा समाजासाठी काम न केलेल्या खासदार, आमदार यांचा निषेध करण्यासाठी श्रध्दांजलीही वाहण्यात येणार आहे.
कल्याण डोंबिवली बंदसह सकाळी 10 वाजता शिवाजी महाराज चौकापासून ते तहसिल कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असून नागरिक आणि व्यापाऱ्यांनी या बंदला सहकार्य करण्याचे तसेच शहरातील शाळाही उद्या बंद ठेवाव्यात असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी औरंगाबाद येथे आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीला धनंजय जोगदंड, सोमनाथ सावंत, अरविंद मोरे, शाम आवारे, अनिल डेरे, प्रशांत काळे, हर्षवर्धन पालांडे, प्रशांत शिंदे, संदीप देसाई, दर्शन देशमुख, शरद पाटील यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.