ठाणे- ठाण्यात मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. सगळीकडे आंदोलन शांततेत सुरू असतानाच ठाण्यात आंदोलकांनी गाड्यांवर दगडफेक केली होती. परंतु गाड्या फोडणारे हे आंदोलक नसून समाजकंटक असल्याची महत्त्वपूर्ण माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली आहे. आंदोलन पेटवण्या-या 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, पोलीस पूर्ण संरक्षण देत आहेत, असंही परमवीर सिंग म्हणाले आहेत.ठाण्यातील वागळे इस्टेट येथे सकाळी आंदोलकांनी टीएमटीच्या बसची तोडफोड केली होती. शिवाय तीनहात नाका परिसरात आंदोलकांनी घोषणाबाजी करत मुंबईकडे येणारी वाहतूक रोखून धरल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तर दुसरीकडे, माजीवाडा पुलावर आंदोलकांनी टायर जाळून निषेध नोंदवला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून मराठा आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. तसंच कोणतीही अडचण आल्यास किंवा अनुचित घटना घडल्यास 100 नंबर आणि ट्विटर अकाऊंटवर माहिती देण्याची सूचना पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आली होती.आंदोलनावेळी समाजकंटकांकडून काही अनुचित प्रकार घडवला जाऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने संपूर्ण राज्यात घडणा-या हालचालींवर बारीक नजर ठेवली होती. विशेष शाखेकडून सर्व घटनांचा आढावा घेतला जात होता. मुंबई पोलिसांसह राज्य राखीव सुरक्षा बल, केंद्रीय सुरक्षा बल, शीघ्रकृती दल (क्यूआरटी), फोर्स वन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) शहरात तैनात होते.
Maratha Kranti Morcha मराठा आंदोलन समाजकंटकांनी पेटवले, ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 5:56 PM