डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील मराठा समाजाचा मूक मोर्चा पुढील रविवारी निघणार आहे. या पार्श्वभूमीवर दसऱ्याला डोंबिवलीत मराठा समाजाच्या वतीने सीमोल्लंघन रॅली काढण्यात येणार आहे. मराठा क्र ांती मूक मोर्चाच्या वातावरणनिर्मितीच्या दृष्टीने या रॅलीला महत्त्व आले आहे. ठाण्यात निघणाऱ्या मोर्चाचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने डोंबिवलीकर मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी सावित्रीबाई फुले कलामंदिरात झाली. या बैठकीला डोंबिवलीकर मराठाबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाण्यातील मोर्चामध्ये ठाणे, पालघर आणि नवी मुंबई विभागातील मराठा समाजाचे बांधव सहभागी होणार आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने ठाणे जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे या मोर्चाच्या गर्दीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अगदी शिस्तबद्ध आणि शांततेत हा मोर्चा व्हावा, त्याचे योग्य नियोजन स्थानिक पातळीवरून करण्यासाठी रविवारी डोंबिवलीत बैठक झाली. मोर्चाची जनजागृती आणि वातावरणनिर्मितीसाठी दसऱ्याला सीमोल्लंघन रॅली काढणार आहे. या रॅलीमध्ये मराठा समाजबांधवांनी आपल्या दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसह पारंपरिक वेशात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
दसऱ्याला मराठ्यांची सीमोल्लंघन रॅली
By admin | Published: October 10, 2016 3:28 AM