Ketaki Chitale : वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडलेली अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ठाणे सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. नवी मुंबई येथील रबाळे पोलीस ठाण्यात केतकीविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयानं २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर केला.
यापूर्वी ठाणे सत्र न्यायालयात केतकीच्या वकिलांनी तिला जामीन मिळावा यासाठी युक्तीवाद केला होता. या प्रकरणी युक्तीवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयानं पुढील सुनावणीसाठी १६ जून ही तारीख दिली होती. दरम्यान, न्यायालयानं आज तिला २५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
यापूर्वी झालेल्या युक्तीवादादरम्यान केतकीचे वकिल योगेश देशपांडे यांनी या अॅट्रोसिटी गुन्ह्यात लावण्यात आलेले कलम योग्य नसल्याचा युक्तीवाद केला होता. तर केतकीच्या अॅट्रोसिटी जामीन अर्जावर ठाणे न्यायालयात झालेल्या युक्तीवादादरम्यान सरकारी वकील अमित कटारणवरे यांनी आपली बाजू मांडली होती. केतकीला या प्रकरणी जामीन मिळाला असला तरी तिला अद्यापही तुरूंगातच राहावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरी आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी पुढील सुनावणी २१ जून रोजी होणार आहे.तर दुसरीकडे केतकी चितळेच्या अटकेप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानंही दखल घेतली आहे. महिला आयोगानं महाराष्ट्राच्या डीजीपींना नोटीस पाठवली आहे. तसंच त्यावर सात दिवसांमध्ये स्पष्टीकरणही मागितलं आहे.
अटक बेकायदेशीरतर दुसरीकडे आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत केतकी चितळेनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केतकीला १५ मे रोजी शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अटक करण्यात आली होती.