ठाणे : गुजराती, मल्याळी प्रेक्षक आपल्या भाषिक कार्यकमाबाबत कमालीचे जागरुक असतात. पण मराठी प्रेक्षक, ग्राहक म्हणून जेवढे जागरुक असतात तशी जागरुकता चॅनल्सवरील कार्यक्रमाविषयी दिसत नाही. चॅनल्सवरील कार्यक्रमाच्या क्वालिटीबद्दल मराठी प्रेक्षकांनी जागरुकता दाखविणे गरजेचे आहे, असा कळकळीचा सल्ला प्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक डाॅ. गिरीष ओक यांनी येथे दिला. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना आपल्या मुलाखतीत ते बोलत होते.
डाॅ गिरीश ओक यांची प्रकट मुलाखत रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला समितीच्या पदाधिकारी नंदिनी गोरे यांनी घेतली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व व्याख्यानमालेचे आयोजक आ. संजय केळकर, सचिव शरद पुरोहित, सुहास जावडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मराठी माणसांच्या ग्राहक आणि प्रेक्षक अशा दोन प्रवृत्त्या दिसतात. ग्राहक म्हणून प्रत्येक वस्तूंची एमआरपी, वस्तूंची अंतिम तारीख तो निरखून पहातो. वस्तुचा भावही नीट करतो. ग्राहक म्हणून दिसणारी मराठी माणसांची जागरुकता, टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या चॅनल्सवरील कार्यक्रमाबाबत कुठे जाते ? असा प्रश्न करुन डाॅ गिरीष ओक यांनी सांगितले की, गुजराती, मल्याळी प्रेक्षक आपल्या भाषिक कार्यकमाबाबत कमालीचे जागरुक असतात. कार्यक्रम दिसला जरी नाही तरी शेकडो फोनकाॅल्स चॅनल्स दाखविणाऱ्या जातात. मराठी कार्यक्रम दिसला नाही तर माझ्यासारखा एखादाच फोन करुन विचारतो.चॅनल्सवरील कार्यक्रमात क्वालिटी हवी असेल तर मराठी माणसांनी रिॲक्ट व्हायला हवे, शेवटच्या कडीला प्रश्न विचाराला हवा. या कार्यक्रमात बसलेल्या 800 प्रेक्षकांनी जरी चॅनल्सला कार्यक्रमाच्या क्वालिटीबद्दल साधे पत्र लिहून विचारले तरी चॅनल्सवरील कार्यक्रमाची क्वालिटी बदलेल. असे बोलल्याबद्दल चॅनल्सवाले कदाचित नाराज होतील, मला ओरडतीलही पण आपण त्याची पर्वा करत नसल्याचे डाॅ गिरीष ओक यांनी स्पष्ट केले.
प्रेक्षक जेव्हा नाटक पहायला येतात तेव्हा ते नाटकाच्या तिकीटात; थिएटरचे पार्किंग, आख्खे थिएटर विकत घेल्याप्रमाणे वागतात. नाटक सुरु असतानाच चक्क लाडूचे डब्बे उघडून लाडू खाताना दिसतात, डब्याच्या झाकणाचा आवाज स्टेजवर येत असतो. काही प्रेक्षक मस्तपैकी गरमागरम वडे खात असतात. त्या वड्याचा वास स्टेजवर पोहोचलेला असतो. पहिल्या रांगेत बसलेले काही प्रेक्षक तर नाटक सुरु असतानाही मोबाईलवर बोलत असतात. "सुखाची भांडतो आम्ही" या नाटकाच्या वेळी तर माझे सहकलाकार, अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी मोबाईलवर बोलणार्या प्रेक्षकाला पाहून नाटकच थांबविले होते. प्रेक्षकांच्या या त्रासाला कंटाळून जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी नाट्यगृहात जामर बसविण्याचा सल्ला दिला होता पण त्यावरूनही वाद झाला असे सांगुन डाॅ गिरीषओक म्हणाले की, नट जेव्हा स्टेजवर काम करत असतो तेव्हा तो ही एक जिवंत माणूस असतो. थिएटरमध्ये होणाऱ्या प्रत्येक घडामोडींचा त्याच्यावर परिणाम होत असतो. बादली वाकडी नाही केलीत तर विहिरीतून पाणी येणार नाही. नाटकाचा फील घ्यायचा असेल तर थोडे वाकायला लागेल. थिएटरही अद्यावत (स्वच्छ) ठेवायला हवे. मी देणारा आहे, तुम्ही घेणारे आहात. याची जाणीव ठेवावी, असे आवाहन डाॅ. गिरीषओक यांनी केले.
आपल्या अभिनय क्षेत्रातील संघर्षाच्या आठवणींना उजाळा देताना डाॅ. गिरीष ओक यांनी म्हटले की, नाटकाच्या वेडापायी नागपूरहून मुंबई येताना चांगले चालणारे दोन्ही दवाखाने बंद करुन, 56 खोल्यांचे घर सोडून, ऐषोआरामाचे जीवन सोडून विदर्भ संघाच्या इमारतीत दरदिवशी 10 रुपये भरुन लोखंडी खाटेवर झोपत असे, काॅमन सौचालयात जात असे, विदाऊट प्रवास करुन पैसे वाचवून फक्त एकवेळच्या जेवणावर व चहावर दिवस काढले. सुरुवातीला नाटकात नटाचे रिप्लेसमेंट म्हणून काम मिळाले. अवहेलना, कुचंबणा, उपासमार, अपमान सारे काही सहन केले. 1984 ते 1988 या पाच वर्षांच्या या संघर्ष काळात, जागेची, जन्माची, मित्रांची, माणसांची सर्वांची किंमत कळली. पहिल स्वतंत्र नाटक "दीपस्तंभ " मिळाले आणि भोगलेले सारे ज्वालामुखी सारखे उसळून आले, ते सगळे दबलेले, दाबलेले "दीपस्तंभ" या नाटकामध्ये जीवतोड अभिनय करताना निघाले. यानंतर मी मागे वळून पाहिले नाही. व्यावसायिक नाटक, दूरदर्शनवरील मालिका, चित्रपट, लेखन, दिग्दर्शन सारे सारे काही केले. अरुणा ढेरे यांच्यासह कार्यक्रम केले. "चिवित्रांगण" सारख्या पुस्तकाचे, निळू फुले, डाॅ श्रीराम लागू, मंगेश तेंडूलकर यांच्या साक्षीने निघाले. अनेकांची मनसोक्त दाद मिळाली, कौतुक झाले. यामुळे माझा व्हील पाॅवरवर भयंकर विश्वास आहे. आपण मजबूत असू तर सगळे बदलु शकतो, अशी आशा डाॅ गिरीष ओक यांनी व्यक्त केली.
डाॅ गिरीष ओक यांनी आपल्या संपूर्ण मुलाखतीत रसिक प्रेक्षकांना आपल्या अभिनयाप्रमाणेच खिळवून ठेवले. अनेक किस्से, अनुभव, "आकाशमिठी" या नाटकाच्या प्रयोगाचा अविस्मरणीय प्रसंग सांगुन सतत हसत ठेवले. "म्हातारी मेल्याचे दूख नाही, काळ सोकावतो." हे वाक्य सतत सांगत, आपण मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने कसे केले हे सांगण्याचा व अभिनयाच्या क्षेत्रात येणार्यांना यातुन प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. नाटक, सिरियल, सिनेमा यांचे कार्य कसे चालते याचेही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आपली अभिनयाची सुरुवात ठाण्यात झाल्याचा आवर्जून उल्लेखही त्यांनी केला. डाॅ गिरीष ओक यांना ऐकण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती.