भिवंडी : मराठी भाषा आणि त्याचा वापर हा सर्वव्यापी असल्यामुळे कालानुरूप व्यवसायरूपी शिक्षणातून त्याचा योग्य वापर करणे आवश्यक असल्याचे मत रुईया महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख डॉ. लीना केदारे यांनी व्यक्त केले.
येथील बीएनएन महाविद्यालयात मराठी भाषा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मराठी भाषा आणि व्यवसाय संधी या विषयावर त्या बोलत होत्या. मराठी भाषा वाङ्मय मंडळ आणि आयक्यूएसी यांच्या वतीने हा कार्यक्रम ऑनलाइन झाला. मातीशी नाळ जोडणारी मराठी भाषा हवी असे सांगून डॉ. केदारे म्हणाल्या की, या भाषेचा प्रवास खूप अनन्यसाधारण आहे. ज्ञानोबा, तुकाराम या संतश्रेष्ठींनी या भाषेला विश्वव्यापी केले. त्यामुळेच मॉरिशस येथे मराठी भाषा शिकवली जाते. आपल्या भाषेबद्दल न्यूनगंड बाळगणे चुकीचे आहे. आजही सर्वच सरकारी व्यवहार, आदेशपत्र हे मराठीमधून काढले जातात. त्यासाठी अशा व्यक्तींची आवश्यकता असते. त्यामुळे सर्वप्रथम आधी आपली मातृभाषा मराठी ही परिपूर्ण शिकून मग तुम्ही अन्य भाषा आत्मसात करू शकता असेही त्या म्हणाल्या.
मराठी विषयातून स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत दाखल होता येते हे भूषण गगराणी तसेच विश्वास नांगरे पाटील आणि अन्य मंडळींनी सिद्ध केले आहे याकडे लक्ष वेधून डॉ. केदारे यांनी मुलांना व्यवसायधारित शिक्षण तेही मराठी भाषेतून घेण्याचे आवाहन केले. पत्रकारिता, संवाद लेखन, स्तंभलेखन, पटकथा आदी अनेक संधी उपलब्ध असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाघ यांनी प्रास्ताविक केले. मराठी भाषा विभागप्रमुख डॉ. राजीव डोंगरदिवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. शाम सावंत यांनी सूत्रसंचालन केले.