ठाणे - हिंदी वेबसिरीज मराठी प्रेक्षकांना फारशा पाहायला आवडत नाही. त्यामुळे मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म हा एक चांगला पर्याय मराठी प्रेक्षकांकडे आलेला आहे. पुढची पिढी ही आता मोबाईलमध्येच राहणार आहे. त्यामुळे वेब मीडियाला जितके लवकर स्वीकारता येईल तितके ओटीटीकडे वळता येईल असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी केले.
मराठी ग्रंथ संग्रहालय येथे मॅजेस्टीक बुक डेपोच्यावतीने आयोजित केलेल्या मॅजेस्टीक गप्पाचे चौथे पुष्प गुंफण्यात आले. यावेळी कुलकर्णी यांची मुलाखत अमोल परचुरे यांनी घेतली. त्या पुढे म्हणाल्या की, सोशल मीडियावर मी फार कमी वेळ घालविते. परंतू तेथे अनेक चांगले ग्रुप्स काम करत असतात. सध्याचे सोशल मीडियावरील वातावरण पाहिले तर प्रचंड वेगाने मूल्यांची घसरण होताना दिसत होते. कालच्या पेक्षा आज वाईट अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
‘चीप’ गोष्टी आजूबाजूला घडत आहेत. सोशल मीडियावर खोलात न शिरता उथळपणे फटाफट कॉमेंट्स सुरू असतात. या कॉमेंट्समुळे एखाद्याच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो मात्र, याची चाड कोणाला राहिलेली नाही अशी नाराजी देखील कुलकर्णी यांनी व्यक्त केली. प्रत्येक चांगला मराठी सिनेमा हा मराठी प्रेक्षकांनी पाहिला पाहिजे तरच मराठी सिनेमे टिकतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.