- हुसेन मेमन, जव्हार
रस्ते, शिक्षण, आरोग्य, पाणी आणि वीज या आजकालच्या प्राथमिक गरजा आहेत. मात्र, त्या आभावी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यत येणारे रुईघर व बोपदरी या ग्रामपंचायतीच्या परिसरातील सव्हीसशे लोकसंख्येच्या परिसराची पुरती दुर्दशा झाली आहे. आधुनिक काळातही ते स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थितीचा सामना करीत आहेत.जव्हार तालुक्यातील दादरानगरहवेली व गुजरातच्या सरहद्दीवर ही गावे आहेत. या ग्रामपंचायतीत चंदोशी, भोकरण, गोंडपाडा, पाचबुड, ठाणपाडा, बचकेचीमाळी, चिंचपाडा अशा या ग्रामपंचायतीची २ महसूली गावे ७ पाडे असून येथे २ हजार ६०० अशी शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती आहे. ही ग्रामपंचायत महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यापासून ४५ कि.मी. अंतरावर असून, दादरा नगरहवेली व गुजरात राज्याला लागून आहे. ही ग्रामपंचायत साखरशेत प्राथामिक आरोग्यकेंद्राच्या आहे. मात्र हे केंद्र ३३ कि.मी. अंतर असल्याने, रुग्णांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. येथील रुग्णांसाठी १५ कि.मी. अंतरावर दाभेरी येथे आरोग्य फिरते पथक येते, परंतु गेल्या वर्षभरापासून त्यासाठी डॉक्टरच नसल्याने, ही सुविधा मिळत नाहीत. हे गाव खोल दरीत आहे. त्यामुळे येथे कोणत्याही मोबाईल व लॅँडलाईन फोनचे नेटवर्क नसल्याने, शासनाच्या आरोग्याच्या कोणत्याही सुविधा वेळेत मिळत नाहीत.प्राथमिक शिक्षण मराठी असल्याने गुजराती नाकारतातयेथे पहिली ते पाचवीपर्यंत प्रत्येक पाड्यात जिल्हा परिषद शाळा असून, कसेबसे शिक्षण मिळते. मात्र पुढील शिक्षणाचे वर्ग नसल्याने अनेक विद्यार्थीना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. या गावांला लागून दादरा नगरहवेली व गुजराती शाळा आहेत. परंतु येथील मुलांचे शिक्षण हे मराठीतून झालेले असल्याने, त्यांना गुजराती शाळेत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे शिक्षणासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे येथे १० वी पर्यंतची आश्रमशाळा काढण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा करूनही अपूर्णच राहिली आहे. वर्गणी काढून बनविला रस्तारुईघर बोपदरीला जाणारा मुख्य रस्ता हा ३५ वर्षापूर्वी केलेला असून त्यावर मोठ-मोठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे तेथे एसटी जात नाही. खाजगी वाहने देखील पोहचत नाहीत. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी शासनाच्या निधीची वाट न पाहता, एकत्र येवून बंद झालेल्या रस्त्यासाठी प्रती कुटुंब शंभर रुपये वर्गणी काढून रस्त्याची डागडूजी केली आहे.आम्हाला अनेक मुलभूत सुविधा मिळत नाहीत. आम्ही ग्रामस्थांनी शासनाकडे अनेक वेळा आरोग्य, शिक्षण, रस्ते विद्युत या सुविधा मिळण्यासाठी सतत मागणी केली आहे. मात्र आमच्याकडे मंत्री, खासदार, आमदार यांचे व शासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. - विनायक गरेल, ग्रामस्थ, बोपदरी