ठाणे : मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा वाढला असून, त्याचा पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. ठाणे शहरात तब्बल २५ पक्ष्यांना उष्माघाताचा फटका बसला असून, त्यांना ठाण्यातील सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल (एसपीसीए) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात घार, घुबड, ससाणा यांचा समावेश आहे. २५ पैकी काही पक्ष्यांना औषधोपचार करून सोडण्यात आले आहे.
मार्च महिना सुरू झाल्यापासून तपमानात कमालीची वाढ झाली आहे. सायंकाळीही उन्हाचे चटके लागत आहेत. या वाढलेल्या तापमानाची झळ पक्ष्यांसाठी घातक ठरत असून, उष्माघातामुळे जखमी अवस्थेत सापडणाऱ्या पक्ष्यांमध्ये वाढ झाली आहे. उन्हाळ्यात उष्माघाताने जखमी होण्याचे प्रमाण पक्ष्यांमध्ये अधिक असते. उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांना उन्हाची तीव्रता अधिक भासत असल्याने कबुतर, घार, घुबड, ससाणे, अशा पक्ष्यांचे रुग्णालयात भरती करण्याचे प्रमाण वाढते. या महिन्यात आतापर्यंत २५ पक्षी उष्माघातामुळे घायाळ व जखमी झाले आहेत. त्यात घार- ११, घुबड- ६, तर ससाणा- ८ इतके पक्षी आहेत. जे कमी जखमी झाले होते, त्यांना औषधोपचार करून सोडले आहे. ज्यांची गंभीर जखम आहे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे एसपीसीए रुग्णालयाचे विश्वस्त, सचिव डॉ. सुहास राणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. घोडबंदर परिसरात जंगलतोडीमुळे उन्हाचा चटका तीव्र बसत असल्याने या परिसरात जखमी अवस्थेत सापडणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाण जास्त असल्याचे ते पुढे म्हणाले.
तापमानात झालेली वाढ पक्ष्यांच्या जिवावर बेतत आहे. वाढत्या उष्माघातामुळे पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊन हवेत उडतानाच जमिनीवर कोसळून ते जखमी होण्याचे प्रकार वाढत आहेत. यात पक्ष्यांचे पंख तुटणे, डोक्याला दुखापत होणे या उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, सध्या कडाक्याचा उन्हाळा आहे. त्यामुळे शक्य त्याठिकाणी नागरिकांनी पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे, असे आवाहन पक्षीप्रेमींनी केले आहे.