उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील कबरस्थानच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनेने कैलास कॉलनी ते महापालिका दरम्यान मंगळवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन देऊन कबरस्थान रद्द करण्याची मागणी केली.
उल्हासनगर पूर्वेला कबरस्थान नसल्याने, शहरातील मुस्लिम बांधवाना दफन विधीसाठी कल्याण व अंबरनाथ येथे जावे लागत होते. मात्र तेथील स्थानिक नागरिकांकडून दफनविधीला विरोध करीत असल्याने, शहरातील मुस्लिम बांधवांची कुचंबणा होत होती. कबरस्थानसाठी लढा दिल्यावर, सुरवातीला महापालिकेने कॅम्प नं-१ येथील उल्हास नदी शेजारी आयडीआय कंपनी जवळील भूखंड कबरस्थानसाठी दिला. यामध्ये काहीजण न्यायालयात गेलेतरी कबरस्थान सुरू आहे. त्यानंतर कॅम्प नं-५ येथील कैलास कॉलनी मध्ये कबरस्थानची मागणी मुस्लिम संघटनेने लावून धरल्यावर, त्याठिकाणीही कबरस्थान साठी भूखंड देण्यात आला.
दरम्यान महापालिकेने कबरस्थान भूखंडा भोवती संरक्षण भिंतीचे काम सुरू केले. या कबरस्थान पासून काही मीटर अंतरावर अंबरनाथचे जुने प्रसिद्ध शिवमंदिर आहे. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसरात कबरस्थान नको. दुसरीकडे द्या, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनेने घेतली. यामध्ये बजरंग दल सारख्या संघटनेचा समावेश आहे. सोमवारी काही संघटनेच्या नेत्यांनी आयुक्त अजीज शेख यांनी भेट घेऊन कबरस्थान बाबत चर्चा केली. तसेच आयुक्तांनी कबरस्थानच्या संरक्षण भिंतीचे काम बंद ठेवण्याचे आदेश दिले.
शासनाने कबरस्थान बाबत अहवाल मागितला असून तो पाठविल्याची माहिती आयुक्त अजीज शेख व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. मंगळवारी विविध हिंदुत्ववादी संघटना, स्थानिक नागरिकांनी कैलास कॉलनी शिवमंदिर ते महापालिका मुख्यालय असा भव्य मोर्चा काढला. साधू संतासह नागरिकांनी मोर्चात सहभाग घेऊन कबरस्थानला भूसखंड देण्याला विरोध केला. महापालिकेने शासनाने मागितल्या प्रमाणे कबरस्थान बाबत अहवाल पाठविला असून शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे डोळे लागले आहे.