उल्हासनगर : धोकादायक इमारतीमुळे बेघर झालेल्या नागरिकांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी महापालिकेवर मोर्चा काढला. मोर्चात लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. आयुक्त सुधाकर देशमुख यांना मागण्यांचे निवेदन दिले.
उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून गेल्या महिन्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तब्बल १३ इमारती रिकाम्या करण्यात आल्या. यामुळे शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. मेहक इमारत कोसळून ३१ कुटुंबे रस्त्यावर आली असून त्यांच्यासह इतर धोकादायक इमारतींमधील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी ३१ आॅगस्टपासून साखळी उपोषण सुरू केले. बेघर झालेल्यांनी महापालिका प्रशासनासह राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गोलमैदान ते महापालिका असा मोर्चा काढला. मोर्चात ज्येष्ठांबरोबरच लहान मुलेही सहभागी झाली होती.
शिष्टमंडळाने आयुक्त देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले. यामध्ये इमारतीचे पुनर्वसन करणे, प्रत्येक कुटुंबाला ५० हजार मदतस्वरूपात देणे, बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू करणे, इमारतीला चार चटईक्षेत्र देणे आदी प्रमुख चार मागण्या करण्यात आल्या आहेत. आयुक्तांनी सरकारी नियमानुसार मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले.