सुरेश लोखंडे/ठाणे, लाेकमत न्यूज नेटवर्क: जिल्हयातील विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्याना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एनपीएस) बंद करुन जुनी पेंन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणींसह प्रलंबित विविध मागण्यांसाठी येथील सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण, ग्रामविकास आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचा-यांनी मंगळवारी एकत्र येत ठाणे जिल्हाधिकारी कायार्लयावर माेर्चा काढला.
कळवा येथील लघूपाटबंधारे विभागाच्या कार्यालयापासून हा माेर्चा निघाला असता त्यास शासकीय विश्रामगृहाजवळ आडवण्यात आले. राज्य शासकीय कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली कर्मचा-यांनी हा माेर्चा काढला. या माेर्चाच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. या शिष्टमंडळात कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस सूर्यकांत इंगळेख् जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पिंगट, उपाध्यक्ष् मिलिंद माेरे, भुषण भानुशाली, महेश शिंदे आदींचा समावेश हाेता.
या माेर्चात महिला कर्मचा-यांचाही समावेश माेठ्याप्रमाणात हाेता. या माेर्चेकरांनी सर्वांनी ‘एकच मिशन जुनी पेन्श्न’ ही घाेषणा लिहिलेल्या टाेप्या घातलेल्या हाेत्या. विविध घाेषणांचे फलक घेऊन कर्मचारी या माेर्चात सहभागी झालेले आढळून आले. शासनाने डीसीपीएस/एनपीएस याेजना लागू करून कर्मचा-यांवर अन्याय केला असल्याचा आराेप करीत या योजनेमुळे कर्मचा-यांचे सेवा निवृत्तीनंतरचे जीवन पूर्णतः अंधकारमय झाल्याचे त्यांनी निवेदनात नमुद केले. त्यामुळे ही याेजना बंद करून जुनी पेंशन योजना लागू करावी, कार्यरत पदांचा सुधारित आकृतीबंध त्वरित रद्द करावा, गृहनिर्माण सोसायटीला शासकीय भुखंड शासकीय दरात उपलब्ध करावा आदी मागण्यां या माेर्चेक-यांनी यावेळी केल्या.