भातसानगर : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आदिवासी समाजाला मूलभूत अधिकार मिळत नसल्याच्या विरोधात श्रमजीवी संघटनेने साेमवारी शहापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मात्र, या देशातील गरीब आदिवासींना अजून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले नसल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे.
अनेक सुविधांपासून व मूलभूत हक्कांपासून आदिवासी वंचित आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे श्रमजीवींनी सांगितले. संघटनेने १ ते ९ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक ठिकाणी जाऊन गरीब कातकरी आदिम जमातीत कुटुंबांचा सर्व्हे केला असता अनेक कुटुंबांकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, घरकुल जॉब कार्ड, मतदान ओळखपत्र, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा आजपर्यंत पोहोचल्या नाहीत. रोजगार नसल्यामुळे त्यांना पोटभर अन्न मिळत नाही, त्यांना किमान मूलभूत सुविधा देणे हे सरकार व प्रशासनाचे कर्तव्य आहे. हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हा अधिकार मिळाला नाही तर येत्या काळात अहिंसेच्या मार्गाने आंदोलन, मोर्चे उपोषण करून तो मिळवून घेण्याचे काम श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी ठाणे जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, तालुका अध्यक्ष राजेंद्र महस्कर, प्रकाश खोडक व शेकडो मोर्चेकरी उपस्थित होते.
या आहेत प्रलंबित मागण्या
आदिम जमातीच्या प्रत्येक कुटुंब व इतर आदिवासींमधील विधवा अपंग यांना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना याचा लाभ देण्यात यावा. प्रत्येक आदिवासी कुटुंबाचा सर्व्हे करून आधार कार्ड जातीच्या दाखल्यासाठी शोधमोहीम घेऊन प्रत्येक गावात घेऊन जातीचे दाखले आधार कार्ड देण्यात यावेत. आदिवासी विशेषतः आदिम जमातीच्या कुटुंबांना शासनाच्या सुविधा देण्यात याव्यात.