सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील सार्वजनिक शौचालय जागी गार्डन बांधण्याला स्थानिक नागरिकांनी विरोध करून आंदोलनाचा इशारा दिला. तर महापालिका मुख्यलया मागील सार्वजनिक शौचालय जागी समाजमंदिर बांधल्याने बहुजन वंचित आघाडीच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी धडक मोर्चा काढून जाब विचारण्यात आला आहे.
उल्हासनगर सोनार गल्ली येथील महापालिका सार्वजनिक शौचालय जागी उभारलेल्या अवैध बांधकामावर गेल्या आठवड्यात पाडकाम कारवाई केली. तसेच बांधकाम करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार नवीन असतांना कॅम्प नं-३ सुभाषनगर येथील महापालिका शौचालयाच्या जागी गार्डन उभारण्याला स्थानिक नागरिकांनी विरोध केला. यावेळी आरपीआय निकाळजे गटाचे शहराध्यक्ष नवनाथ निकाळजे यांनी महापालिका आयुक्त अजीज शेख याना निवेदन देवुन शौचालयाच्या जागेवर गार्डन ऐवजी शौचालयाची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली. शौचालय बांधले नाहीतर, पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
महापालिका मुख्यालय मागील अग्निशमन विभागाच्या कार्यालय ठिकाणी महापालिकेचे सार्वजनिक शौचालय होते. परिसरातील नागरिक या शौचालयाचा उपयोग करीत होते. दरम्यान स्थानिक नागरिकांचा विरोध डावलून शौचालय ठिकाणी समाजमंदिर बांधण्यात आले. याप्रकारने स्थानिक नागरिकांत असंतोष निर्माण झाला. वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्याच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा काढून शौचायल बांधण्याची मागणी केली. याप्रकारने महापालिका मालमत्ता सुरक्षित नसून स्थानिक नागरिकांना विचारात घेतले जात नसल्याचे चित्र शहरात निर्माण झाले. गेल्याच महिन्यात महापालिका शाळा मैदानावर एका खाजगी संस्थेला सनद दिल्याचा प्रकार उघड होऊन एकच खळबळ उडाली आहे. याप्रकारावरून महापालिका मालमत्तेच्या सुरक्षितेवर प्रश्न उभा ठाकल्याचे बोलले जात आहे.