ठाणे : निर्माता नीरज ग्रोवर हत्याकांडामध्ये मुंबई सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावलेली दाक्षिणात्य अभिनेत्री मारिया सुसायराज विरूद्ध ठाणे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी शनिवारी चौघांना अटक केली होती. कर्जाच्या नावाखाली व्यावसायिकास आरोपींनी ३ कोटींना लुबाडले आहे.घाटकोपर येथील सुरेश डोडिया हे तक्रारदार आहेत. त्यांना ३0 कोटी कर्ज हवे होते. आपल्या कंपनीमार्फत हे कर्ज मिळवून देऊ, असे आरोपींनी त्यांना सांगितले. त्यासाठी आरोपींनी त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. काही दिवसांनी त्यांनी कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. त्यांना ३0 कोटीचा डिमांड ड्राफ्ट दाखवला. मात्र त्यापूर्वी कर्जाचे प्रक्रिया शुल्क द्यावे लागेल, असे आरोपींनी सांगितले. रक्कमेची खात्री करण्यासाठी आरोपींनी त्यांना एचडीएफसी बँकेच्या आॅपेरा हाऊस शाखेमध्ये नेले. तिथे एका कर्मचाऱ्याने कंपनीच्या खात्यात १५0 कोटी असल्याचे सांगितले. डोडिया यांनी २ कोटी ९२ लाख ४७ हजार ३७१ रुपये वळते केले. मात्र, डिमांड ड्राफ्ट बनावट असल्याचे लक्षात आल्यावर डोडिया यांच्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मारिया सुसाईराज, हनिफ अब्दुल रहेमान शेख, सुधीर वेदपाठक, प्रकाश अगरवाल, दिनेश अगरवाल, अख्तर, सुशिलभाई, एचडीएफसीच्या आॅपेरा हाऊस शाखेचा कर्मचारी प्रकाश दामा आणि अहमदाबाद येथील नानाभाई उर्फ सुधाकर हे या प्रकरणामध्ये आरोपी असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली.कोण आहे मारिया सुसाईराज?मारिया सुसाईराज ही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. २00८ साली एका मोठ्या टीव्ही प्रॉडक्शन हाऊसमध्ये कामाला असलेल्या नीरज ग्रोवर यांची हत्या झाली होती. या प्रकरणामध्ये मारियासह तिच्या एका मित्राला पोलिसांनी अटक केली होती. मुंबई सत्र न्यायालयात या प्रकरणाचा खटला चालला. न्यायालयाने मारियाला ३ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती.
ग्रोवर हत्याकांडातील आरोपी मारियावर फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:58 AM