ठाणे : फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये एका दाक्षिणात्य अभिनेत्री मारिया सुसाईराजचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला. निर्माता नीरज ग्रोवर हत्याकांडामध्ये मुंबई सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या या अभिनेत्रीविरुद्ध गेल्या महिन्यात तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.घाटकोपर येथील सुरेश नाथालाल डोडिया हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. व्यवसायासाठी त्यांना ३० कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. हे कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली आरोपींनी त्यांची तीन कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. डोडिया यांच्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलिसांनी गेल्या महिन्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाकडे या प्रकरणाचा तपास असून पोलिसांनी या प्रकरणी ठाण्यातील पारुमिता चक्रवर्ती, स्नेहा उर्फ अनिता सुधीर वेदपाठक (देशपांडे) आणि मीरा रोड येथील हेन्री निकोलस फर्नांडिस याच्यासह नवी मुंबईतील कामोठे येथील मिलिंद रघुनाथ कदम यांना अटक केली होती. दाक्षिणात्य अभिनेत्री मारिया सुसाईराजसह आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे.दरम्यानच्या काळात मारिया सुसाईराजने ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला. या गुन्ह्याशी आपला संबंध नसल्याचा दावा तिने केला. मात्र, सरकारी पक्षाने प्रभावीपणे बाजू मांडल्याने न्यायालयाने शुक्रवारी तिचा जामीन अर्ज फेटाळला. पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. कुटे या प्रकरणाचा तपास करत आहेत.गुन्हेगारी पार्श्वभूमी मारिया सुसाईराज ही नीरज ग्रोवर हत्याकांडातही आरोपी होती. या प्रकरणामध्ये मारियासह तिच्या एका मित्राला पोलिसांनी अटक केली होती. मुंबई सत्र न्यायालयाने या हत्याकांडामध्ये मारियाला तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती.
मारियाचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 1:39 AM