लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मोटारकार खरेदीसाठी तसेच बँकेचे हाप्ते फेडण्यासाठी पतीसह सासू सासरे अशा सासरच्या सहा जणांविरुद्ध शनिवारी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय, चार लाख ६९ हजारांच्या स्त्री धनाचा अपहारही केल्याचा आरोप या विवाहितेने केला आहे.कोपरीमध्ये वास्तव्यास असलेल्या या ३० वर्षीय विवाहितेने २१ आॅगस्ट २०२१ रोजी ही तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीनुसार पती मयूर जगताप, सासू प्रमिला, नणंद दिपा, नंदोई संदीप मैनकर, नणंद श्रद्धा आणि नंदोई अविनाश खोमणे आदींनी १३ जून २०१९ ते २८ आॅक्टोंबर २०१९ या कालावधीत कट रचून तिचा छळ केला. कहर म्हणजे लग्नाआधीच पती मयूर याचे दुसऱ्याच महिलेबरोबर विवाहबाहय संबंध आहेत, ही बाब लग्न ठरवितेवेळी तिच्यापासून तसेच तिच्या आई वडिलांपासून लपवून ठेवली. तिच्या नोकरीतून मिळणारा पगार तसेच तिच्या आई वडिलांच्या संपत्तीवर नजर ठेवून हेतूपूर्वक फसवणूक केल्याचेही तिने या तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय, तिच्याकडे मोटारकार खरेदी आणि बँकेचे हाप्ते भरण्यासाठीही पैशांची मागणी केली. ती पूर्ण न केल्याने तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन वेळोवेळी शिवीगाळ आणि धक्काबुक्की करीत ठार मारण्याचीही धमकी दिली. त्यातच छोटा नंदोई अविनाश याने तर तिचा विनयभंगही केल्याचा आरोप आहे. शिवाय, तिच्या तीन लाख ६० हजारांच्या दागिन्यांसह चार लाख ६९ हजारांच्या स्त्री धनाचाही त्यांनी अपहार केला. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात मारहाण, धमकी देणे, शिवीगाळ करणे, हुंडयासाठी छळ करणे आणि विनयभंगाच्या कलमांनुसार या विवाहितेने ठाणे न्यायालयात तक्रार दिली. कलम १५६ नुसार ही तक्रार दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.