ठाणे/डोंबिवली/कल्याण : गणपती-नवरात्रोत्सवादरम्यान बाजारपेठेवर असलेले मंदीचे मळभ दूर झाले असून दिवाळीच्या खरेदीसाठी रविवारी बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. चालताही येत नव्हते इतकी गर्दी गणपतीनंतर प्रथमच पाहायला मिळाली. त्यामुळे व्यापाºयांचा उत्साह वाढला आहे. सध्या सहामाही परीक्षा सुरू आहेत. त्या संपल्या की पुढच्या शनिवार-रविवारी गर्दी उच्चांक गाठेल, असा विश्वास त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी जीएसटीच्या दरात कपात केल्याने आणि त्याआधी इंधनाच्या करांचे दर कमी केल्याने बाजाराचा नूर पालटला. गेल्या आठवड्याच्या सुरूवातीपर्यंत जाणवणारे मंदीचे, निरूत्साहाचे वातावरण बदलले. त्याचे दर्शन रविवारी बाजारातील गर्दीने घडले.कपडे, दागिन्यांची खरेदी, फराळाच्या आॅर्डर यावर ग्राहकांचा सर्वाधिक भर होता. आॅनलाइन खरेदीवर सध्या भरपूर सवलतींचा वर्षाव सुरू आहे. जुन्या वस्तू देऊन नव्या खरेदी करण्याचा ट्रेंड आहे. तोच ट्रेंड दुकानांमध्येही पाहायला मिळतो आहे. खास करून इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, भांडी, घर स्वच्छतेची उपकरणे यात हा ट्रेंड सर्वाधिक पाहायला मिळतो.‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा,’ ही उक्ती खरी ठरावी इतका उत्साह या सणानिमित्त दिसतो आहे. पगाराचे वेळापत्रकही गाठले गेल्याने शनिवारपेक्षा रविवारी खरेदीसाठी जास्त गर्दी झाली. कपडे, पादत्राणे, आकाशकंदिल, रोषणाईसाठी दिवे-माळा, फटाके, फराळ अशा विविध गोष्टींपासून नवी वाहने, घरे खरेदीसाठीही दिवाळीचा मुहूर्त गाठला जातो.विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरू असल्याने इतर दिवशी खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे वीकएण्डला थोडी थोडी खरेदी करावी, असा विचार करुन रविवारी ठाणेकर खरेदीसाठी बाहेर पडले. स्टेशन रोडपासून जांभळी नाक्यापर्यंतचा रस्ता तर दुपारीच तुडुंब गर्दीने वाहात होता. बसुबारस सोमवारी असल्याने पुढचा आठवडा-खास करू शनिवार-रविवार दिवाळीच्या खरेदीचे शेवटचे दिवस असतील. त्यामुळे त्या काळात यापेक्षाही दुप्पट-तिप्पट गर्दी होईल, असे विक्रेत्यांनी सांगितले.
बाजार चैतन्यमय, दुपारपासूनच झुंबड : आठवडाभरात उत्साहाला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 2:02 AM