पालघर- विविध आजाराचा सामान्य करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी म्हटले आहे. हुतात्मा स्मारक प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होत.
यावेळी जिल्हा परिषद अध्याक्ष वैदेही वढाण, खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, राजेश पाटील जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे तसेच कृषी विभागाचे वरीष्ठ अधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.
कोरोना तसेच उद्भवणाऱ्या विविध आजाराच्या पार्श्वभूमीवर रानभाज्याचे विशेष महत्व आहे. या रानभाज्या सर्व नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून 500 रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. कोणत्याही रसायानाचा वापर न करता नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्या निरोगी आयुष्य जगण्यासाठी उपयुक्त असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी बाधवांनी पारंपारिक पध्दतीने रानभाज्यांचे जतन केले आहे. या रानभाज्याच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांची आर्थिक परीस्थिती उंचावेल, असा विश्वास पालकमंत्री दादाजी भूसे यांनी यावेळी व्यक्त केला.
रानभाज्या जास्तकाळ टिकूण राहाव्यात यासाठी शीतगृह कोल्डट्रान्सपोर्ट, गोडाऊन उपलब्ध करून देण्यात येईल. रानभाज्यांच्या माध्यमातून प्रक्रीया उद्योगांना चालणा देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेच्या माध्यमातून शेतकरी गट, औषध कंपन्या यांनी पुढाकार घेऊन रानभाज्याचे महत्व नागरिकांपर्यत पोहचहविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही भूसे यांनी यावेळी केले.
रानभाजी महोत्सवांमध्ये कंदभाज्या, हिरव्या भाज्या फळभाज्या, पावसाळ्याच्या सुरवातीला येतात व त्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याचे दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. या रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहचविणे आणि त्यातून आदिवासी बांधवाना उत्पनाचे स्रोत निर्माण करणे या करिता रानभाज्या प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनास स्थानिक नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.
पालकमंत्री भूसे यांनी लोकप्रतिनीधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच पालघर जिल्ह्यातील नागरिकांना रानभाज्या खरेदी करण्याचे आवाहन केले.