कल्याण - लाखोंचा खर्च करून आपल्या मुलीचा साखरपुडा केला. मात्र नवरदेवासह त्याच्या कुटुंबाने हुंड्याची केलेली मागणी पूर्ण करता न आल्याने ठरलेले लग्न मोडल्याची घटना कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक केली आहे.
सदर पिडीत मुलगी आपल्या कुटुंबासह कल्याण पश्चिम चिकण घर परिसरात राहते. या तरुणीचे भिवंडी काल्हेर गावात राहणाऱ्या संतोष पाटील (25) या तरुणाशी विवाह ठरला होता .त्यांचा 11 एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता तसेच यावेळी 7 मे हि लग्नाची तारीख ठरली होती .साखरपुड्याच्या दोन दिवसांनी संतोष व त्याचे कुटुंबीय मुलीच्या घरी आले त्यांनी साखरपुड्यात तरुणीला दिलेले दागिने बहाण्याने परत नेले. त्यानंतर तरुणीच्या घरी फोन करत रोकड, गाडी व सोने असे मिळून एकूण 10 लाख रुपयांची मागणी केली. मात्र परीस्थित बेताची असल्याने आपण हे देवू शकत नसल्याचे तरुणीच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर पाटील यांनी ठरलेल्या लग्नास नकार दिला.याप्रकरणी मुलीच्या कुटुंबाने महात्मा फुले पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दखल करत संतोष पाटील याला अटक केली. संतोषला आज कल्याण न्यालयात हजर करण्यात आले असता त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण वाघ करीत आहेत...