ठाणे : पतीसह सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनी आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात रविवारी घडली. उर्वी मेहता(२९) असे महिलेचे नाव आहे. तिच्या वडिलांनी याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला.तक्रारीनुसार फेब्रुवारी २०१७ मध्ये ऊर्वीचा प्रियांक मेहताबरोबर प्रेमविवाह झाला होता. ती मुलुंड येथील एका खासगी कंपनीत कामाला जात होती. लग्नात मुलीला त्यांनी १० तोळ्यांचे सोन्याचे, तर दोन किलो चांदीचे दागिने दिले होते. त्यांनी सुमारे १० लाखांचा लग्नाचा खर्चही केला होता. लग्नानंतर सहा महिन्यांनी घरी आलेल्या ऊर्वीने पती प्रियांकने दोन ते तीन वेळा मारहाण केल्याचे सांगितले. तसेच संशयावरून त्याच्यासह सासरची मंडळी वारंवार छळ करत असल्याचेही तिने सांगितले. सप्टेंबर २०१८ मध्येही कामावरून उशिरा आल्याबद्दल तिच्या सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली होती. हे प्रकरण तिच्या सासरच्या लोकांनी माफी मागून मिटवले होते. त्याचदरम्यान तिची जाऊ पायल हिनेही तिला मूल होत नसल्यामुळे हिणवले होते. तिला कोणत्याही प्रकारचे डिप्रेशन नसतानाही तिला सासरची मंडळी डिप्रेशनची गोळी देत असत. यात तिला नेहमी झोप येत होती. त्यामुळेच तिची मानसिक स्थितीही ढासळली होती. या औषधाबाबतही सासरच्या मंडळींनी उडवाउडवीची उत्तरे देऊन तिला पुन्हा गोळी देणार नाही, असा दावा केला.५ आॅक्टोबरला ती माहेरी आली. ६ आॅक्टोबर रोजी मात्र तिने दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या ‘कशिश पार्क’ येथील घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी ७ आॅक्टोबर रोजी तिच्या वडिलांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात पती प्रियांक, सासरा पंकज, सासू माया, जाऊ पायल आणि दीर वरुण यांच्याविरोधात तक्रार दिली.
पतीसह सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 1:21 AM