ठाणे : दोन वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या ठाण्यातील एका विवाहितेने सोमवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या सावत्र आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीला मंगळवारी अटक केली.तेवीसवर्षीय नीशाचा विवाह डिसेंबर २०१६मध्ये लोकमान्य नगरातील गुरुकृपा चाळीत राहणाऱ्या अनिल गायकवाड यांच्याशी झाला. गुरुकृपा चाळीमध्ये पहिल्या मजल्यावर नीशा पतीसोबत राहायची, तर तळ मजल्यावरील खोलीमध्ये तिचे सासरे रंगनाथ भागोजी गायकवाड आणि सासू सोजर गायकवाड राहतात. नीशाची सावत्र आई आशा गायकवाड याच भागातील एका चाळीमध्ये राहते. त्यांच्या तक्रारीनुसार, नीशाची सासरची मंडळी लग्न झाल्यापासून तिचा छळ करायची. मानपानाचे निमित्त करून तिला टोमणे मारायचे. घरगुती कामातील चुका काढून तिला त्रास द्यायचे. नीशा परिचारिकेचे प्रशिक्षण घेत होती. मात्र, सासरची मंडळी तिला कामावर जाण्यास मज्जाव करत होती. रिक्षाचालक असलेल्या पतीने तिला वैवाहिक सुखापासून वंचित ठेवल्याचा आरोपही नीशाच्या आईने केला आहे. या परिस्थितीला नीशा कंटाळली होती. सोमवारी सायंकाळी ती घरात एकटीच होती. त्यावेळी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. नीशाच्या आईच्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलिसांनी तिच्या पतीसह सासूसासºयावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अनिल गायकवाड याला मंगळवारी रात्री अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 6:16 AM