ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला ठाण्यातून मध्यप्रदेशात पळवून नेणा-या अतुल सिसोदिया (२२) याला सोमवारी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्या तावडीतून सुखरुप सुटका केलेल्या या मुलीला पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले.ठाण्याच्या सावरकरनगर भागात राहणारी ही १७ वर्षीय मुलगी १६ सप्टेंबर २०१७ पासून बेपत्ता झाली होती. तिच्या पालकांनी १७ सप्टेंबर रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त महादेव भोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर, निरीक्षक रवीदत्त सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन आंब्रे यांच्या पथकाने तिचा शोध सुरू केला. जमादार आर. के. दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी काळे, समीर बेग आदींच्या पथकाने थेट मध्यप्रदेशातील कंचनपूर (ता. चंदला, जिल्हा छत्रपूर ) येथून सिसोदियाला रविवारी ताब्यात घेतले. तिच्यासह दोघांनाही सोमवारी रात्री १०.३० वाजता ठाण्यात आणण्यात आले. तिला आता पालकांच्या स्वाधीन केले असून त्याच्याविरूद्ध पळवून नेणे, विनयभंग, पोक्सो (बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम ) आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी ठाणे न्यायालयाने त्याला ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.गुन्हेगारी पार्श्वभूमीचे गावमध्यप्रदेशातील ज्या कंचनपूर गावातून या मुलीची ठाणे पोलिसांनी सुटका केली, त्या गावात अनेकजण अनैतिक व्यवसायात अडकले आहेत. तर बºयाच जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. सिसोदियाच्या भावाविरुद्धही यापूर्वी एका मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मुलीची वर्तकनगर पोलिसांनी सुखरुप सुटका केल्याबद्दल तिच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.