लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पतीबरोबर झालेल्या क्षुल्लक भांडणामुळे घर सोडून थेट साताऱ्यातील नातेवाइकांकडे गेलेल्या १९ वर्षीय विवाहितेचा शोध घेण्यात नौपाडा पोलिसांना यश आले. तिला रविवारी सुखरूप तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्याच्या पाचपाखाडीतील नामदेव वाडी भागात राहणारी ही विवाहिता २० ऑगस्ट रोजी दुपारी १ ते ४.१६ वाजण्याच्या दरम्यान घरातून अचानक बेपत्ता झाली. घरातून बाहेर पडताना तिने कोणालाही कोणतीही माहिती दिली नव्हती. ‘मी स्वत:च्या मर्जीने घर सोडत आहे, मला कोणीही शोधू नका, आईची काळजी घ्या,’ इतकाच त्रोटक मजकूर असलेली चिठ्ठी सोडून ती बेपत्ता झाल्याने तिचे कुटुंबीय हादरले. नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी गांभीर्याने दखल घेतली. पोलीस कॉन्स्टेबल किशोर काळे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तिचा शोध घेतला असता, साताऱ्यातील एका गावात तिचे लोकेशन मिळाले. त्यानंतर या गावातील पोलीस पाटील तसेच स्थानिकांच्या मदतीने तिला ताब्यात घेण्यात आले. तेंव्हा घरातील वादामुळे घर सोडल्याचे व या काळात सातारा बस स्थानकातच वास्तव्याला असल्याचा दावा तिने केला. नौपाडा पोलिसांनी तिला फोनद्वारे विश्वासात घेतले. तसेच स्थानिक पोलीस पाटील यांनीही तिची समजूत घातली. त्यानंतर ती रविवारी पुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात आली. अखेर तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
...........
* सिम कार्ड बदलले
या विवाहितेने घर सोडल्यानंतर एका दुकानातून नवीन मोबाइल सिम विकत घेतले. या नव्या सिमवरून तिने एका नातेवाइकाशी संपर्क साधला. त्यामुळे तिचा शोध घेण्यात अडचण होती. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत नौपाडा पोलिसांनी तिचा शोध घेतला.
.............
वाचली.