ठाणे : कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ठाणे महापालिकेने एक पाऊल पुढे टाकून आता भविष्यात असे हल्ले रोखण्यासाठी महापालिकेच्या तसेच बोर्डाच्या सर्व सुरक्षारक्षकांना आत्मरक्षण, चाकूहल्ला संरक्षण, सेल्फ डिफेन्सचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सकाळी दोन तास शंभर सुरक्षारक्षकांनी यासंदर्भात धडे गिरविण्यास सुरुवात केली
ठाणे महापालिकेची सुरक्षा अजून बळकट करण्याकरिता महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या सूचनेनुसार शनिवारपासून या प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. एखाद्या वेळी अधिकाऱ्यांवर अचानक हल्ले होतात. ते कसे रोखावे, त्याचबरोबर कशाप्रकारे स्वतःचे व अधिकाऱ्यांचे रक्षण करावे याकरिता मार्शल आर्ट, ज्युडो यांचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. मुंब्य्रातील दि लेजंट ऑफ मार्शल आर्ट या संस्थेने पुढाकार घेतला आहे. ५४ अंगरक्षक तसेच ४५ महाराष्ट्र सुरक्षाबलाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ठाणे पालिकेच्या सुरक्षा विभागातर्फे आयोजित केलेल्या या शिबिरात मुख्य सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र थोरवे यांनीदेखील सहभाग घेतला.