ठाणे : मासिका महोत्सव- मासिक पाळी संबंधी अंधश्रद्धांवर भाष्य करून त्या नष्ट करण्याच्या प्रमुख हेतूने साजरा होणारा हा मासिक पाळीचा उत्सव, या वर्षी खंडीय सीमा ओलांडून, आफ्रिकेतील सहा देशांतही आयोजित केला जातोय. भारत आणि नेपाळसह केनिया, नामिबिया, रॉंडा, दक्षिण सुदान,युगांडा आणि झांबियातही हा उत्साह मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे. मासिका महोत्सवा भारत आणि नेपाळमध्ये २०१७ साजरा करण्यात आला. कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावमुळे, २०२१ चा हा उत्सव भारत व नेपाळमध्ये बहुतांशी प्रमाणात ऑनलाइन स्वरूपात तर आफ्रिकेत ऑफलाईन स्वरूपात, विविध उपक्रमांनी भरलेला असणार आहे.
म्युस फाउंडेशन या युवा संस्थेमार्फत शाश्वत स्वरूपात मासिक पाळी हाताळणे यासाठी 'अ पिरियड ऑफ शेअरिंग' हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमांतर्गत 'मासिका महोत्सव' ही संकल्पना स्त्रिया आणि ट्रान्सजेन्डर व्यक्तींना केवळ मासिक पाळीमुळे तोंड द्याव्या लागणाऱ्या रुढीजात भेदभवांना, ज्यामुळे त्यांना शिक्षण ,रोजगार तसेच मानाने जगण्याच्या संधी गमवाव्या लागतात, अश्या रूढींना आळा घालण्यावर एक उपाय म्हणून राबवली जाते. कोविड-१९ या वैश्विक संकटामुळे समाजातील वेगवेगळ्या स्तरांवर मासिक पाळी संदर्भात वेगवेगळ्या समस्यांची तीव्रता वाढली तसेच वाढत्या आर्थिक असमानतेमुळे, आशिया आणि आफ्रिकेतील स्त्रिया आणि ट्रान्सजेन्डर व्यक्तींना मासिक पाळी दरम्यान गरजेच्या सुरक्षित सोयी-सुविधांचा अभाव जाणवतो आहे. लॉकडाऊनमुळे झालेले उलट-पक्षी स्थलांतर यामुळे ग्रामीण भागात मोठ्या संख्येने स्त्रीयांना पाळी संबधी सोयीचा अभाव जाणवतो आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात पायी गाव गाठणाऱ्या महिलांना शौचालयासारख्या प्राथमिक सुविधा सुद्धा उपलब्ध नव्हत्या. पारंपारिकरित्या, मासिक पाळी संदर्भात गैरसमज बर्याच संस्कृतीत दिसून येतो. मासिक पाळीला किळसवाण्या नजरेने बघितले जाते व त्यासाठी स्त्रियांना किंवा ट्रान्सजेन्डर व्यक्तींना शिक्षा दिली जाते. अशा परिस्थितीत मासिक पाळी येणाऱ्या व्यक्तीचे शैक्षणिक व रोजगाराच्या हक्कांचे हनन केले जाते. ग्रामीण भारतात व नेपाळमध्ये काही ठिकाणी अजूनही मासिक पाळी दरम्यान महिलांना घराबाहेर झोपडीमध्ये राहावे लागते. कितीतरी महिलांनी जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात व आजारपणामुळे आपला जीव गमावला आहे.
या सगळ्या रूढी परंपरा पिढी दर पिढी पोसल्या जातात, संस्कृतीत जोपासल्या जातात ज्यामुळे या प्रश्नांना तोंड देणे अतिशय अवघड होते. त्यामुळे मासिक पाळी सणासारखी साजरी करून निषिद्ध समजल्या जाणाऱ्या मासिक पाळी सारख्या विषयात हात घालता येतो. विविध प्रकारची गाणी, खेळ, नाच व इतर उपक्रमांद्वारे मासिक पाळीविषयी संवाद सुरु करण्यास मदत होते व लोकांना त्यांच्या कोशातून बाहेर काढण्यास मदत होते. यामुळे महिलांना व ट्रान्सजेन्डर व्यक्तीना मासिक पाळी संदर्भात उघडपणाने संवाद साधणे शक्य होते. ज्या सामान्य व नैसर्गिक क्रियेमुळे जीवसृष्टी कायम राहते त्या संबंधी मोकळ्या मनाने त्या संवाद साधू शकतात. यामागे अजून एक उद्देश पुरुषांना मासिक पाळी विषयी बोलते करणे हा ही आहे, जेणेकरून पुरुष आपल्या सामाजिक विशेषाधिकारांचा वापर करून मासिक पाळी विषयीचे गैरसमज दूर करू शकतात. या व्यतिरिक्त हे फेस्टिवल शाश्वत पाळीच्या पद्धती यावरही आवश्यक प्रकाश टाकते. शाश्वत पाळीच्या पद्धती या मासिक पाळी येणाऱ्या व्यक्ती तसेच पर्यावरणासाठीही आरोग्यदायी ठरतात. यामध्ये मासिक पाळीसाठी कप व कापडी पॅडचा समावेश आहे. डिस्पोजेबल सॅनिटरी नॅपकिन्स (डीएसएन), महागड्या जाहिरातींद्वारे मोठ्या उत्पादकांद्वारे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत, त्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असते ज्यामुळे ते मानवी शरीरासाठी आणि वातावरणासाठी अतिशय घातक ठरतात. नॉन-बायोडिग्रेडेबल असल्याने त्यांना विघटित होण्यास सुमारे ५०० ते ८०० वर्षे लागतात, तर त्यांचा वापर फक्त काही तासांसाठीच होतो.
२०१७ मध्ये मासिका महोत्सव सुरू झाल्यापासून त्याची भौगोलिक पोहोच प्रत्येक वर्षाबरोबर वाढतच आहे. वेगवेगळ्या सांस्कृतिक संदर्भातील अधिकाधिक संस्था उत्सवात सामील होत असल्याने लैंगिक गैरसमज मोडून काढण्याच्या प्रयत्नांना अधिकाधिक यश मिळत आहे व अनेक गैरसमज दूर होत आहेत. यावर्षी आमच्याबरोबर सहभागी झालेल्या संस्था पुढीलप्रमाणे: रेड सनशाईन, दार्जिलिंग प्रेरणा, रेड इज द न्यू ग्रीन, जिजीविशा फाउंडेशन, सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (सीएफटीआय), ग्लोबल शेपर्स, प्रोजेक्ट अमारा, मुहीम, द राइजिंग एनजीओ, होप इज लाइफ नेपाळ, लाइव्ह हेल्दी इनिशिएटिव्ह्ज, अविमो गर्ल्स सपोर्ट फाउंडेशन, फेमे स्पर एन, टीन प्रेग्नन्सी अवेयरनेस (टीपीए), वुमेन्स एक्शन फॉर डेव्हलपमेंट, डुकटाझ, वेलबिंग फाउंडेशन, अराइस आफ्रिकन युथ, ब्लेड रेड गो ग्रीन, ठाणे प्रसूती व स्त्रीरोगविषयक सोसायटी (टीओजीएस) आणि व्हिस्पर अ ड्रीम फाउंडेशन. या उपक्रमाला प्रोजेक्ट नावेली यांनी पाठिंबा दर्शविला आहे. आमच्या भागीदार संस्था वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रात या उत्सवाचे नेतृत्व करीत आहेत आणि संबंधित समुदायांच्या सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या मान्य असलेल्या निकषांनुसार त्यास आकार देत आहेत. यादरम्यान पीरियड फेस्टिव्हल कला, संवाद, माहितीपट, संगीत, वेबिनार आणि इतर विविध अभिनव माध्यमांद्वारे साजरा केला जाईल तसेच झांबियाच्या लुसाकामध्ये गर्भाशयाच्या आकाराचे केक कापत हा उत्सव साजरा केला जाईल! या उत्सवाची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे ज्याने मासिक पाळी संबंधी चहूबाजूंनी विचार केला जाईल ज्यामध्ये समाजातील सर्व घटकांचा समावेश असेल तसेच ट्रान्स व्यक्ती व पुरुषांना देखील याविषयी विचार करण्यास प्रवृत्त करण्याचा मानस या उत्सवाचा आहे.