वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील अंबाडीजवळील एका खेडेगावात १३ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार आणि मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीडित आणि तिच्या कुटुंबीयांना धीर देत गणेशपुरी पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना शनिवारी मध्यरात्री अटक केली.
श्रमजीवी संघटनेच्या अंबाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात शनिवारी दुपारी अंबाडीजवळील एका खेडेगावतील व्यक्ती आपली पत्नी आणि १३ वर्षीय मुलीसोबत येऊन गावात आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार केली. मात्र मारहाणीचे कारण सांगण्यास ताे टाळत हाेता. संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी त्याच्या पत्नीला आणि मुलीला बाजूला विश्वासात घेऊन विचारले असता गावातील चार अल्पवयीन मुलांनी दोन महिन्यांपूर्वी गावातील एका पडीक बंगल्यात तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार त्यांना समजला. त्यानंतर लागलीच त्यांना गणेशपुरी पोलीस ठाण्यात नेत पोलिसांना माहिती दिल्यानंतर या प्रकरणात तथ्य आढळल्यानंतर पोलिसांनी गावातील चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर अत्याचार आणि मारहाणीचे दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना कोर्टाच्या आदेशानुसार भिवंडी रिमांड होममध्ये ठेवण्यात आल्याची माहिती गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी दिली. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेउन अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले, भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राम भालसिंग, पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती जाणून घेतली.