नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडीतआग लागण्याचे सत्र सुरूच असून तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीतील स्वराज्य कंपाऊंड मधील तयार कपडे, प्लास्टिक पाईप, कागदी पुठ्ठा साठविलेल्या गोदामास भीषण आग लागल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या आगीत पाच गोदामे जळून खाक झाली आहेत. दरम्यान अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तब्बल दहा तासांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे.
या आगीच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण, ठाणे अग्निशामक दलाच्या प्रत्येकी एक गाडी घटनास्थळी दाखल असून खासगी टँकरच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. ही गोदामे भली मोठी असल्याने आतमध्ये जाऊन आग विझविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणी येत होत्या. त्यातच गोदामातून मोठया प्रमाणावर धूर निघत असल्याने त्याचाही त्रास होत होता. अखेर दहा तासांनी आग आटोक्यात आली असून या आगीने नेमकी कारण अजून समजू शकले नाही. सुदैवाने आग पहाटे लागल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.