भिवंडी - भिवंडी शहरात मागील काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून दररोज कोठे ना कोठे यंत्रमाग कारखाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक होत आहेत. आर्थिक वर्षाच्या शेवटी मार्च महिन्यात या घटनांमध्ये वाढ झालेली असून मागील पाच दिवसांत एकूण दहा आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.
शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास शहरातील नारपोली सोनीबाई कंपाऊंड येथील सोल्जर हे अत्याधुनिक यंत्रमाग असलेल्या कारखान्यात आग लागण्याची घटना घडली आहे. पाहता पाहता आगीने उग्र रूप धारण केल्याने एकूण तीन कारखाने या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, त्यावेळी कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांनी तेथून पळ काढल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.परंतु आगीच्या ज्वाला उंच उडत या तिन्ही कारखान्याचे सिमेंट पत्र्याचे छत कोसळून येथील सर्व यंत्रमागा सह तयार व कच्चा कपडा जळून खाक झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी ही आग पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आटोक्यात आणली. सदर कारखाना असलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी पोहचू शकण्यास अरुंद रस्त्यांचा अडथळा होत असल्याने एका बाजू कडील कारखान्याच्या भिंतीस छिद्र पाडून या आग लागलेल्या कारखान्यातील आग विझविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. दरम्यान आगीचे कारण अस्पष्ट असून या घटनेची भोईवाडा पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली आहे.