जितेंद्र कालेकर, ठाणे : राबोडीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांच्या खून प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने संशयित सूत्रधार चाैथा आरोपी ओसामा शेख (३५, रा. उत्तरप्रदेश, ठाणे) याला उत्तरप्रदेशच्या विशेष तपास पथकाच्या (एसटीएफ) मदतीने अटक केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. याच प्रकरणात याआधी तिघांना अटक केली असून तब्बल तीन वर्षांनी या सूत्रधाराला पकडण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे.
जमील यांची तीन वर्षांपूर्वी हत्या झाली होती. ते राबोडीतील बिस्मील्ला हॉटेलसमोरुन २४ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलीवरुन जात होते. त्याचवेळी मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. गंभीर जखमी अवस्थेतील जमील यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. या घटनेचे तीव्र पडसाद ठाण्यात उमटले होते.
या गुन्ह्यातील मोटारसायकलस्वार शाहीद शेख (२२) याला राबोडीतून तर गोळी झाडणाऱ्या इरफान शेख याला उत्तरप्रदेशातून अशा दोघांना यापूर्वीच गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे आणि पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या पथकाने अटक केली होती. फरार ओसामाचा शोध सुरु असतांनाच युनिट एकच्या ठाणे पथकाच्या हाती हबीब शेख याचाही या खूनातील सहभाग असल्याचे काही पुरावे लागले. त्याआधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या पथकाने त्याला २४ सप्टेंबर २०२३ रोजी अटक केली. त्यापाठोपाठ आता ओसामा यालाही एसटीएफचे अधीक्षक बृजेश सिंह यांनी १२ फेब्रुवारी २०२४ राेजी ताब्यात घेतले. ठाणे पोलिसांच्या युनिट एकच्या पथकाने मंगळवारी एसटीएफच्या ताब्यातून त्याला घेतले असून त्याला बुधवारी ठाण्यात आणले जाण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्हयातील गुलरिहा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील खीरिया गावातील तो रहिवासी आहे. त्याने त्याच्या गावातील इरफान उर्फ सोनू याच्या मदतीने जमीलची हत्या केल्याचे बृजेश सिंह यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.चार राज्यांमध्ये केले वास्तव्य-
ठाण्यातून पसार झाल्यानंतर ओसामा हा जम्मू काश्मीरच्या कुपवाडा मध्ये पसार झाला होता. तिथे दीड वर्ष टेलरिंगचे काम केल्यानंतर तो जयपूरमध्ये गेला होता. तिथे काही दिवस राहिल्यानंतर काही दिवस लखनऊमध्ये त्याने तळ ठोकला. एसटीएफ आणि ठाणे पोलिस मागावर असल्याची चाहूल लागल्यानंतर तो दिल्लीमध्ये पसार झाला होता. त्यानंतर जमाती म्हणून मुज्जफ्फरनगरमधील काही मस्जिदमध्ये तो वास्तव्य करीत होता. ठाणे पोलिसांकडून त्याची माहिती मिळाल्यानंतर एसटीएफने त्याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.