- लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आॅगस्ट महिन्यात असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या सरावाकरिता दरवर्षी प्रमाणे यंदा गुरुपौर्णिमेचा मुहूर्त ठाण्यातील बहुतांश गोविंदा पथके साधणार नाहीत, असे संकेत प्राप्त झाले आहेत. दहीहंडी उत्सावावरील बंधनांबाबत येत्या १० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात असलेल्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर अनेक गोविंदा पथके सरावाला सुरुवात करणार आहेत. दहीहंडी उत्सवाचा सराव अनेक गोविंदा पथक हे परंपरेनुसार गुरूपौर्णिमेच्या दिवशीच सुरू करतात. ठाणे शहरात छोटी मोठी अशी ५००च्या आसपास गोविंदा पथक आहेत. परंतु दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने आणलेल्या बंधनामुळे काही गोविंदा पथकांनी उत्सवात सहभागी होणे बंद केले. यंदा शहरात अंदाजे ३५० च्या आसपास गोविंदा पथके उतरणार असली तरी बहुतांश गोविंदा पथके उद्या आपल्या सरावाचा श्रीगणेशा करणार नाहीत. अनेक पथके १० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या निर्णयाची वाट पाहत आहेत. दहीहंडीची उंची व बाल गोविंदांचा सहभाग यावर न्यायालयाने बंधने आणली आहेत. या निर्बंधाविरोधात दहीहंडी समन्वय समिती आणि जय जवान गोविंदा पथक कोर्टात लढा देत आहेत. महाराष्ट्रातील सर्वच गोविंदा पथकांचे लक्ष त्या निकालाकडे लागले आहे. कोर्टाने हंडीची उंची व बालगोविंदांच्या सहभागावरील बंधने उठवली तर पथकांची संख्या वाढेल. मात्र बंधने कायम राहिली तर ३०० ते ३५० गोविंदा पथकेच उत्सवात सहभागी होण्याची शक्यता आहे, असे महाराष्ट्र गोविंदा पथक समन्वय समितीचे सचिव समीर पेंढारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. निर्णय काहीही लागला तरी उत्सव साजरा करणार, अशी ठाम भूमिका घेणाऱ्या पथकांचा सराव १६ जुलैपासून सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
दहीहंडी सरावाचा गुरुपौर्णिमेचा मुहूर्त कोर्टाच्या दाव्याने हुकला
By admin | Published: July 09, 2017 1:49 AM