डोंबिवली : पावसाने उघडीप देताच केडीएमसीने येथील ठाकुर्ली उड्डाणपुलावरचे खड्डे डांबरीकरणाने बुजवायला सुरुवात केली आहे. पश्चिमेच्या बाजूला पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी पूर्णपणे डांबरीकरण केले आहे. कल्याण पूर्वेतील वालधुनी एफ केबिन उड्डाणपुलावरील खड्ड्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मास्टिक अस्फाल्टचा केलेला प्रयोग यशस्वी झाल्याने आता ठाकुर्ली पुलावरही तो सुरू केला आहे.
ठाकुर्ली उड्डाणपुलावर आणि पोहोच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी वाहतूक मंदावून वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात कोंडीला सामोरे जावे लागत होते. रविवारी रक्षाबंधनाच्या दिवशी एक ते दीड तास कोंडीचा सामना करावा लागला. ‘लोकमत’ने याबाबत ‘डोंबिवलीत रक्षाबंधनाला पूलकोंडी’ या मथळ्याखाली सोमवारी वृत्त प्रकाशित केले होते. वाहतूक पोलिसांसह शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनीही तक्रारीद्वारे मनपाचे येथील खड्ड्यांकडे लक्ष वेधले होते. यानंतर उड्डाणपुलाची जबाबदारी असलेल्या केडीएमसीने सोमवारी मध्यरात्रीपासून खड्डे भरण्यासाठी मास्टिक डांबराचा वापर सुरू केला आहे. कोपर उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचा दावा मनपाने केला असला तरी सध्या ठाकुर्ली उड्डाणपूल हाच एकमेव पर्याय डोंबिवली पूर्व-पश्चिम जाणाऱ्या वाहनांसाठी आहे. खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर मनपाने डांबरीकरणाला केलेली सुरुवात वाहनचालकांसाठी दिलासा देणारी आहे. यासाठी मास्टिकचा पहिला थर पूर्ण केला असून, पावसाने उघडीप दिल्याने दुसरा थरही लवकरच मार्गी लागेल, अशी माहिती शहर अभियंता सपना देवनपल्ली कोळी यांनी दिली.
------------------------------------------------------
मास्टिक अस्फाल्ट म्हणजे काय?
ठरावीक तापमानाला डांबर उकळून ते प्रेशरने रस्त्यावर एकसमान थराच्या जाडीत टाकले जाते. यावर पुन्हा प्रेशरने दाब दिला जातो. यामुळे गरम डांबर खालच्या खडीच्या थराला चिकटते आणि खडीसह ते घट्ट होते. यात रस्त्याचे आयुर्मान वाढते. याआधी कल्याणमध्ये वालधुनी उड्डाणपुलावर मास्टिकचा प्रयोग केला आहे. तो यशस्वी झाल्यावर एफ केबिन परिसरातील पुलावरही तो केला. यात तेथे पडणाऱ्या खड्ड्यांच्या त्रसातून वाहनचालकांची सुटका झाली असताना आता हाच प्रयोग ठाकुर्ली उड्डाणपुलावर केला आहे. दरम्यान, एक वर्षापूर्वी नव्या पत्रीपुलावर पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणीही एमएसआरडीसीनेही मास्टिकचा वापर केला आहे.
------------------------------------------------------