ठाणे : कचराळी तलावाच्या सुशोभीकरणाचा नारळ फुटल्यानंतर आता ठाणे शहराची शान असलेला मासुंदा तलावही कात टाकणार आहे. महापौर संजय मोरे यांनी सोमवारी या तलावाची पाहणी केली असून या तलावाचे संवर्धन आणि सुशोभीकरण आधुनिक पद्धतीने केले जाईल, असा दावाही त्यांनी या वेळी केला. तसेच कृत्रिम तलावात नागरिकांकडून निर्माल्य तसेच तुटलेल्या अवस्थेतील देवदेवतांचे फोटोही विसर्जन केले जातात. त्यामुळे कृत्रिम तलावातील पाणी दूषित होऊन त्याचा प्रादुर्भाव मुख्य तलावाला होत असून या ठिकाणी निर्माल्यकलश ठेवण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले. विशेष म्हणजे या तलावातील पाणी शुद्ध करून ते इतर वापरासाठी करण्यासाठीही हालचाली केल्या जाणार आहेत. मासुंदा तलावाभोवती निर्माल्यकलश असूनदेखील काही नागरिक भावनेपोटी कृत्रिम तलावात निर्माल्य, तुटलेल्या अवस्थेतील देवदेवतांचे फोटोही विसर्जन करतात. त्यामुळे येथील कलश काढले असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, या ठिकाणी पुन्हा निर्माल्यकलश तातडीने लावण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी, चेंबरमधील व इतर सांडपाणी तलावात जाऊ नये, यासाठी तलावाच्या सभोवताली गटार तयार करण्याबाबत पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. तलावाभोवती असलेल्या टांगेवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून घोड्यांच्या लीदमुळे या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य असते. टांगेवाल्यांची वाढती संख्या व रस्त्याच्या दुतर्फा असलेली पार्किंगसाठी संबंधित संघटना व वाहतूक पोलिसांची बैठक आयोजित करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मासुंदा तलाव कात टाकणार
By admin | Published: December 08, 2015 12:43 AM