मुरबाड : प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकेसह एकही कर्मचारी हजर नसल्याने एका गरोदर महिलेची प्रसूती रस्त्यातच करावी लागली. मुरबाड तालुक्यातील तुळई येथे सोमवारी ही घटना घडली. वेळीच वैद्यकीय मदत न मिळाल्याने या महिलेचे बाळ सहा दिवसांनी दगावले.
तालुक्यातील गणेशपूर (ताडाचापाडा) येथील नीलम यादव वडवले या गर्भवतीला २० आॅगस्ट रोजी तुळई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका किंवा अन्य कर्मचाºयापैकी कुणीही हजर नव्हते. फक्त रुग्णालयाच्या जीपचा चालक हजर होता. नीलम यांची प्रसूतीची वेळ जवळ आल्याने, चालक भगत यांनी त्यांना तत्काळ मुरबाडला नेण्याचा निर्णय घेतला. मुरबाड येथे घेऊन जात असताना, वाटेतच नीलम यांची प्रसूती झाली. वेळीच वैद्यकीय मदत न मिळाल्याने नीलम आणि त्यांच्या नवजात अर्भकाला कल्याण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, २६ आॅगस्ट रोजी या अर्भकाचा मृत्यू झाला. या घटनेस तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीधर बनसोडे, परिचारिका आणि कर्मचारी जबाबदार असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मृत अर्भकाचे वडील यादव शांताराम वडवले यांनी केली आहे.एक डॉक्टर कामानिमित्त मुरबाड येथे आले होते. परिचारिका रजेवर होत्या. नवजात अर्भकाचे वजन जेमतेम १ किलो होते. तरीही, बाळ व्यवस्थित होते. त्या मुलाच्या वडिलांनी तक्रार केली आहे. याबाबत तेथील डॉक्टर तसेच परिचारिकांना नोटीस बजावण्यात आली आहे.- श्रीधर बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी, मुरबाड