लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत: गेल्या तीन वर्षांपासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेली नेरळ- माथेरान- नेरळ मिनीट्रेन लवकरच सुरू होणार आहे. सध्या नॅरोगेज मार्गाची दुरुस्ती केली जात असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. मिनी ट्रेनची चाचणी यशस्वी झाल्यास ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये मिनिट्रेन पुन्हा रुळावर येण्याची शक्यता आहे.
नेरळ- माथेरान या मार्गावरील ट्रेन मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीकरिता बंद करण्यात आली होती. या मार्गावर नेरळपासून अमन लॉजपर्यंतच्या २० किलोमीटर मार्गावर नॅरोगेजच्या रुळाखालील सर्व स्लीपर बदलण्यात येत आहेत. त्याचवेळी पावसामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण रोखण्यासाठी करण्यात येणारी कामे सुरू आहेत. या ठिकाणी सिमेंट स्लीपर टाकण्याची कामे प्राधान्याने केली जात असून दररोज मालवाहू गाडी नेरळ येथून माथेरानसाठी सोडली जाते. त्यामुळे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये मिनी ट्रेन सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
नेरळ- माथेरान मिनीट्रेनचा नॅरोगेज
नेरळ- माथेरान मिनीट्रेनचा नॅरोगेज रेल्वे मार्गाचे काम करणे मोठे आव्हानात्मक होते. दररोज पडणारा १०० मि.मी. पाऊस तसेच पुरेसा प्रकाश नाही. एका बाजूला दरी तर दुसऱ्या बाजूला डोंगर असल्याने रस्ता नव्हता. त्यामुळे कामासाठी लागणारे साहित्य कसे न्यायचे, हा मोठा प्रश्न होता. मात्र, तरीही रेल्वे प्रशासनाने हे आव्हान स्वीकारून कामगारांनी दोन सत्रात रात्रंदिवस काम करून ते काम पूर्णत्वाकडे नेले आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"