ठाणे : ठाणे महापालिकेत लोकप्रतिनिधी आणि आयुक्त यांच्यातील विकोपाला गेलेला वाद पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून मातोश्रीवर मिटवल्याचे सांगण्यात येत असले, तरी दोहोंमध्ये अद्याप धुसफूस कायम असल्याचे चित्र बुधवारी दिसले. ठाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापालिकेच्या विकासकामांची यादी वाचून प्रशासनाची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला. ते विकासकामांची यादी वाचत असताना, व्यासपीठावर विराजमान असलेल्या महापौरांना हसू आवरता आले नाही. एकनाथ शिंदे यांनी विकासकामांचे श्रेय घेण्याचा आयुक्तांचा प्रयत्न हाणून पाडत ठाणेकरांच्या हितासाठी लोकप्रतिनिधी व आयुक्तांनी मतभेद बाजूला सारून कामे करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सोमवारी मातोश्रीवर चार भिंतींआड घडलेल्या गोष्टी पुन्हा एकदा गडकरी रंगायतनच्या व्यासपीठावर पाहण्यास मिळाल्या.
गडकरी रंगायतनात विविध कामांचा लोकार्पण सोहळा ठामपाने आयोजित केला होता. यावेळी आयुक्तांनी कार्यक्रमाची माहिती देताना महापालिकेने केलेल्या कामांची जंत्री वाचून दाखवली. त्यामध्ये वॉटर फ्रंट, कोस्टल रोड, शहरातील अंतर्गत मेट्रो, जलवाहतूक, डीजी ठाणेबरोबर क्लस्टर योजनांचा उल्लेख आयुक्तांनी केला. आचारसंहिता लागली नाही तर एक आठवड्यात क्लस्टरच्या कामांचे भूमिपूजन होईल, ते संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी महापौर मीनाक्षी शिंदेंना हसू आवरता आले नाही. मात्र, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी माइक हाती घेताच सर्व कामांची यादीच जाहीर करून आयुक्तांनी माझे काम हलके केल्याचा टोला मारला. मंगळवारी आम्हीही त्यांचे काम ‘हलके’ केले होते, असा चिमटा त्यांनी मातोश्रीवरील दिलजमाईचा अप्रत्यक्ष संदर्भ देत आयुक्तांना काढला. यावेळी शिंदे यांनाही हसू आवरता आले नाही. त्यानंतर, त्यांनी मुद्यावर येत ठाण्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हातात हात घालून काम करीत असल्याचे सांगितले. क्लस्टरचे काम निवडणुकीनंतर सुरू होईल, या आयुक्तांच्या घोषणेचा धागा पकडून निवडणुकीपूर्वी एक तरी नारळ फुटला पाहिजे, तरच मंगळवारी केलेल्या ‘कामाचा’ उपयोग होईल, असे सांगून त्यांनी आयुक्तांना पुन्हा कोंडीत पकडले. महापौर महिला असतानाही रस्त्यावर उतरल्या. ही टीम चांगले काम करत असल्याचे सांगून त्यांनी महापालिकेतील लोकप्रतिनिधींची पाठराखण केली. तुमचे जे असेल नसेल ते बाजूला ठेवा आणि शहराच्या विकासाला प्राधान्य द्या, ठाणेकरांना चांगल्या मूलभूत सोयीसुविधा द्या, अशी समज देऊन या वादावर त्यांनी पुन्हा पडदा टाकला.भाजप नगरसेवकांमध्ये नाराजीआयुक्तांनी जलवाहतूक प्रकल्पाचा उल्लेख करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आणि मेट्रोचा उल्लेख करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले नाही. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक व गटनेते नारायण पवार आणि मिलिंद पाटणकर यांनी आयुक्तांबाबत नाराजी व्यक्त केली.ठाणे सुरक्षित आहे, ते शिवसेनेमुळेठाणे सुरक्षित आहे, ते शिवसेनेमुळेच, हे आपणा सर्वांना माहीत आहे. मी येथे एका पक्षाचे नाव घेत नाही. या व्यासपीठावर युतीची मंडळी आहेत. ठाण्यावर बाळासाहेब ठाकरेंनी प्रेम केले आहे. तसेच स्व. आनंद दिघे यांनीही केले, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.