लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील महिलांना प्रसूतीपर्यंत तब्बल तीन टप्प्यात पाच हजार रुपये प्रधानमंत्री मातृवंदना या योजनेव्दारे सध्या दिले जात आहेत. गर्भाची सुयोग्य पद्धतीने वाढ होऊन जन्माला येणारे बाळ कुपोषित न राहता ते सुदृढ असावे यासाठी या रकमेचा वापर महिलांना करता येतो. जिल्ह्याभरातील गांवपाड्य़ांच्या तब्बल २५ हजार ४३२ (८८ टक्के) पेक्षा जास्त महिलांनी या रकमेचा लाभ घेतल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
या योजनेच्या लाभासाठी गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यापासून म्हणजे १५० दिवसांत नोंद झाल्यानंतर संबंधित मातेला एक हजार रुपये प्रथम दिले जात आहेत. या पहिल्या टप्प्यासह तीन टप्प्यात या महिलेस पाच हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. जिल्ह्यातील या २५ हजार ४३२ महिलांच्या बँक खात्यात या प्रत्येकी पाच हजार रुपये डीबीटीद्वारे जमा झाले आहेत. राज्यस्तरावरून ही रक्कम ऑनलाइन संबंधित मातेच्या बँक खात्यात तीन टप्प्यात जमा होत आहे. या रकमेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी गर्भधारणा होताच नोंद करणे अपेक्षित आहे. यासाठी गावातील आरोग्य यंत्रणेच्या आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकांकडून मार्गदर्शन केले जात आहे.
योजना सुरू झाल्यापासून गेल्या वर्षापर्यंत १०१ टक्के महिलांनी या मातृवंदना योजनेच्या रकमेचा लाभ घेतल्याचा दावा केला जात आहे. जानेवारी २०१७ ते २०१९ या कालावधीत २२ हजार ९४६ महिलांचे उद्दिष्ठ जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेस देण्यात आले होते. त्यापैकी २३ हजार १२९ महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा अहवाल नोंदवण्यात आला आहे. याशिवाय २०२० या वर्षासाठी २८ हजार ८५० महिलांचे उद्दिष्ठ दिले असता त्यापैकी २५ हजार ४३२ महिलांना या योजनेच्या पाच हजार रुपयांचा लाभ देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
..........
* शासकीय रुग्णालयात प्रसूती, तरीही लाभ नाही!
ठाणो : जिल्ह्याच्या ग्रामीण, आदिवासी भागातील महिलांची प्रसूती झालेली आहे. मात्र, आजपर्यंतही काही महिलांना या मातृवंदना रकमेचा लाभ मिळालेला नाही. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रक्कम उपलब्ध नसल्यामुळे या योजनेची रक्कम खात्यात जमा होत नसल्याचे कारण सांगितले जात असल्याचे वास्तव श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार ॲड. इंदवी तुळपुळे यांनी सांगितले.
......
* योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांची संख्या -
* २०१९ - २३१२९ - १०१ टक्के
* २०२० - २५४३२-८८ टक्के
.......