ठाणे : लावणीच्या नावाखाली नवोदित कलाकार जे सादरीकरण करत आहेत ते म्हणजे लावणी नव्हे. मुळात लावणी ही अंगप्रदर्शन दाखविणारी कला नाही, असे खडेबोल लावणीसम्राज्ञी माया जाधव यांनी या कलाकारांना सुनावले. ठाण्यात एका कार्यक्रमाप्रसंगी त्या आल्या होत्या. त्यावेळी लोकमतशी बातचित करताना त्यांनी वरील आक्षेप नोंदविले.
लावणीचे पारंपारिक स्वरुप बदलून जे प्रकार सुरू आहेत. यावर जाधव यांनीही संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, आता जे लावणीचे स्वरुप सादर केले जाते ती मुळात लावणी नाही. शरीरप्रदर्शन आणि लोकांना कसे आकर्षित करायचे हेच या सादरीकरणातून हे नवोदीत कलाकार दाखवून देत आहेत. प्रेक्षकांना मात्र चांगले कळते. आम्ही जेव्हा लावणी करायचो तेव्हा असले काही प्रकार नव्हते. लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती तशीच जपली पाहिजे. लावणीचे स्वरुप बदलून या परंपरेचे नाव खराब करु नका असे आवाहन त्यांनी केले.
लावणी अंगप्रदर्शन दाखविणारी कला नक्कीच नाही. त्यामुळे ज्यांना लावणी शिकायचीच आहे त्यांनी प्रशिक्षण केंद्रामध्ये जाऊन रितसर त्याचे शिक्षण घ्यावे. अंगभर कपडे, नऊवारी नेसूनच लावणी सादर केली जाते. लावणी करण्यासाठी नृत्याची तयारी हवीच. आता लावणीच्या नावाखाली जे काही प्रकार सुरू आहेत तो अत्यंत घाणेरडा प्रकार असून त्याची मला किळस वाटते. माझ्या आयुष्यात मी कधीही अशा प्रकारची लावणी पाहिलेली नाही. लावणीच्या नावाखाली बारगर्ल्स असे करतात असेही जाधव म्हणाल्या.