मीरा रोड - शिवसेनेच्या वतीने काशिमीरा परिसरात शिवसेनेने बॅनरबाजी करत बीएसयूपी योजनेसाठी १२७ कोटींचा निधी राज्य शासनाकडून मंजूर केल्याचे म्हटल्याने महापौर ज्योत्स्ना हसनाळे ह्यांनी आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेनेची बॅनरबाजी लोकांची फसवणूक करणारी असल्याचा घणाघात करत ठेकेदारदेखील शिवसेनेचा असल्याचा आरोप केला.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या रखडलेल्या बीएसयूपी योजनेला आडकाठी ठरणारा सत्ताधारी भाजपाचा स्थायी समितीचा ठराव शासनाने रद्द केल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक ह्यांनी पाठपुरावा करून बीएसयूपीच्या ३ इमारती बांधण्याच्या कामाचे कार्यादेश काढायला लावले. सदर योजना गेल्या १० वर्षांपासून रखडली असून, भाजपाच्या मोदी सरकारने सदर योजनाच बंद केल्याने पालिकेला अनुदान मिळणार नाही आहे. त्यामुळे सदर योजनेसाठी १५० कोटींचे कर्ज एमएमआरडीएकडे पालिकेने मागितले आहे.
सदर योजना महापौर आणि भाजपाच्या अन्य ३ नगरसेवकांच्या प्रभागात असल्याने शिवसेनेचे फलक लागल्यावरून राजकारण तापले आहे. महापौरांनी याबाबत तातडीची पत्रकार परिषद घेऊन सदर लागलेले फलक हे बेकायदेशीर असल्याने त्वरित काढण्याचे आदेश दिल्याचे त्या म्हणाल्या. महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बीएसयूपी योजना रखडली असून, वेळेत योजना पूर्ण केली असती तर अनुदान गमवावे लागले नसते. आता कर्ज घेण्याची पाळी आली नसती . घरे पाडण्यात आल्या नंतर येथील झोपडीधारक नरकयातना भोगत गेली १० वर्षे राहात असून यात राजकारण कोणी करू नये. मग ते शिवसेनेचे नेते असो की आमच्या पक्षाचे नेते, असे त्यांनी बजावले.
शिवसेनेने फलकावर १२७ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतल्याचे तद्दन खोटे आणि नागरिकांची दिशाभूल करणारे लिहिले आहे. असा कोणताच निधी मंजूर झालेला नसून एमएमआरडीएकडून १५० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यातील ४० कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळणार आहे. त्यामुळे आ. सरनाईक आणि शिवसेनेने बीएसयूपी योजनेत असले खोटारडेपणाचे राजकारण करू नये, असा इशारा महापौरांनी दिला. बांधकाम करणारा ठेकेदार शिवसेनेचा असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी भाजपाचे नगरसेवक सचिन म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भोसले ह्यांनी देखील टीकेची झोड उठवत फसव्या राजकारणाचा निषेध करत असल्याचे म्हटले.